मोटार विम्याच्या रकमेवरही प्राप्तिकरात सूट मिळू शकते फक्त...

मोटार विम्याच्या हफ्त्यावर प्राप्तिकरात सूट मिळू शकते का, अशा प्रश्न अनेकांना पडतो.

Updated: Dec 19, 2018, 01:51 PM IST
मोटार विम्याच्या रकमेवरही प्राप्तिकरात सूट मिळू शकते फक्त... title=

मुंबई - प्राप्तिकर वाचविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन केले जाते आणि त्याप्रमाणे गुंतवणूकही केली जाते. प्राप्तिकर वाचविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिले जाते. मग वेगवेगळ्या विमा पॉलिसी घेतल्या जातात. हल्ली प्रत्येकाकडे एकतरी मोटार असतेच आणि त्याचा विमाही दरवर्षी भरला जातोच. मोटार विम्याच्या हफ्त्यावर प्राप्तिकरात सूट मिळू शकते का, अशा प्रश्न अनेकांना पडतो. याचेच उत्तर आपण बघणार आहोत.

मोटार विम्याच्या हफ्त्यावरही प्राप्तिकरदाते प्राप्तिकरातून सूट घेऊ शकतात. पण यामध्ये एक नियम आहे. ज्या मोटारीच्या विमा हफ्त्यावर तुम्ही प्राप्तिकरात सूट मागत आहात ती व्यावसायिक कामासाठी वापरली जायला हवी. जर तुम्ही तिचा खासगी वापर करत असाल, तर मात्र प्राप्तिकरात सूट मिळत नाही. किंबहुना तुम्ही तशी सूट मागूच शकत नाही. 

याचबरोबर संबंधित प्राप्तिकरदात्याला व्यावसायिक कारणांसाठी विम्याचा हफ्ता भरण्यात आला होता. खासगी गोष्टीसाठी त्याचा वापर करण्यात आला नाही. हे सुद्धा सिद्ध करावे लागते, असे टीएएसएस सल्लागार कंपनीचे भागीदार तरणप्रित सिंग यांनी सांगितले. मोटार ही सुद्धा व्यवसायाचा भाग असल्याचे दाखवून दिल्यामुळे त्याच्या विमा हफ्त्याएवढ्या रकमेवर तुम्ही प्राप्तिकरात सूट मागू शकता. फक्त मोटारीचा वापर फक्त व्यावसायिक कारणांसाठीच करण्यात आला, हे दाखवून द्यावे लागते आणि ती जबाबदारी प्राप्तिकरदात्याची असते. त्याचबरोबर विम्याचा हफ्ता भरल्याचा पुरावाही संबंधित प्राप्तिकरदात्याकडे असावा लागतो.