व्हर्जिनिटीबद्दल बिनडोक वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाची हकालपट्टी

कनक सरकार यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली होती.

Updated: Jan 17, 2019, 09:43 AM IST
व्हर्जिनिटीबद्दल बिनडोक वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाची हकालपट्टी title=

कोलकाता - व्हर्जिन मुली या शीतपेयाच्या सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असे बिनडोक विधान करणाऱ्या जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापक कनक सरकार यांची अखेर विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. कनक सरकार यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय संबंध विषय शिकवणारे प्राध्यापक इतक्या खालच्या स्तराचे वक्तव्य कसे काय करू शकतात, असा प्रश्नही विचारण्यात येऊ लागला होता. 

व्हर्जिन मुली या शीतपेयाच्या सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असे कनक सरकार यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. ज्या मुलांना आपली होणारी पत्नी व्हर्जिन आहे की नाही हे माहिती नसते, ते मूर्ख असतात. व्हर्जिन पत्नी एखाद्या परीसारखीच असते, असेही त्यांनी म्हटले होते. फेसबुकवर ही पोस्ट प्रसिद्ध केल्यानंतर सरकार यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपली पोस्ट फेसबुकवरून काढून टाकली. त्याचवेळी आपण आपल्या मतांवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे, असे सरकार यांनी म्हटले होते.

जर एखाद्याला शीतपेयाची बाटली हवी असेल तर तो सील उघडलेली बाटली कशाला घेईल. किंवा एखाद्याला बिस्किटाचा पुडा हवा असेल, तर तो फुटलेला पुडा कशाला विकत घेईल असा प्रश्न विचारत सरकार यांनी स्वतःच्या मुद्द्याचे समर्थन केले होते. जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो, त्यावेळीच ती सीलबंद असते. व्हर्जिन मुलगी म्हणजे संस्कृती, मुल्ये यांची जपणूक असते. त्याचबरोबर लैंगिक शुद्धतेचाही तो भाग असतो, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते. अनेक मुलांसाठी व्हर्जिन मुलगी म्हणजे एखाद्या परीसारखीच असते, असे सरकार यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आपली मूळ पोस्ट फेसबुकवरून काढून टाकली. पण आपल्या आधीच्या पोस्टचे समर्थन करण्यासाठी त्यांनी एक नवी पोस्ट लिहिली. यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुनरुच्चार केला होता.