नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर आता भाजपने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार देखील जाहीर केला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. धनखड यांनी शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि तेव्हापासून त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. (NDA Vice President Candidate)
जयदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली. उपराष्ट्रपदाची निवडणूक (Vice President Election 2022) 6 ऑगस्टला होणार आहे. उमेदवार निश्चित करण्यासाठी शनिवारी भाजपची सर्वोच्च धोरण ठरविणाऱ्या संसदीय मंडळाची बैठक झाली. पक्षाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. देशाच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात. संसदेचे सध्याचे संख्याबळ 780 आहे. त्यापैकी केवळ भाजपचे 394 खासदार आहेत. विजयासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे. विद्यमान
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील. एनडीएने 2017 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले होते.
भाजप या वेळीही आपल्या उमेदवाराच्या विजयाच्या शक्यतांच्या जोरावर मजबूत स्थितीत आहे. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह अनेक राज्यपालांची भेट घेतली होती. याबाबत राजकीय चर्चाही रंगली होती. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनीही मोदींची भेट घेतली.
विरोधकांनी संयुक्तपणे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.