जामिया नगरमध्ये गोळीबार करणारा हल्लेखोर अल्पवयीन?

दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

Updated: Jan 30, 2020, 09:45 PM IST
जामिया नगरमध्ये गोळीबार करणारा हल्लेखोर अल्पवयीन? title=

नवी दिल्ली : दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय. जामियानगरमध्ये सीएएविरोधात रॅली सुरू होणार होती. त्यावेळी हा प्रकार घडला. गोळीबार करणारा हा हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्डवर असलेल्या माहितीनुसार तो १७ वर्षांचा आहे. हल्लेखोर गौतम बुद्ध नगर (नोएडा)च्या जेवरमधल्या घोडीवाला भागात राहतो. गोपालच्या वडिलांचं पानाचं दुकान असल्याचंही सांगितलं जात आहे.

दिल्लीतला जामिया नगर परिसरातून शाहीन बागपर्यंत सीएए, एनआरसीविरोधात रॅली काढली जाणार होती. त्याचवेळी एक बंदूकधारी तरुण तिथं आला आणि त्यानं अचानक आंदोलकांच्या दिशेनं पिस्तूल रोखलं. तो वाट्टेल तसा गोळीबार करत सुटला. भर रस्त्यात गोळ्या झाडत सुटला. या परिसरात पोलीस तैनात होतेच. पोलिसांच्या देखत तो बिनदिक्कत गोळ्या झाडत होता.

या तरुणाच्या गोळीबारात शादाब नावाचा जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला. या हल्ल्यात शादाबच्या हाताला गोळी लागली. अखेर पोलिसांनी या तरुणाला पकडलं.

गोळ्या झाडण्यापूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्हही केलं होतं. फेसबूक प्रोफाईलवर या तरुणाने त्याचं टोपण नाव रामभक्त गोपाल, असं ठेवलं आहे. फेसबुक लाईव्हमध्ये त्यानं चंदनचा उल्लेख केलाय. या चंदनची २६ जानेवारी २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातल्या सांप्रदायिक दंगलींमध्ये हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये सलीम नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलीय. आता या गोळीबाराप्रकरणी तरुणाची आणखी चौकशी सुरू आहे.

गोळीबार करण्याआधी या तरुणाने फेसबुकवर स्टेटस टाकली होती. एका स्टेटसमध्ये त्याने 'आजादी दे रहा हूं' असं लिहिलं, तर दुसऱ्या स्टेटसमध्ये त्याने 'मी इकडे एकमेव हिंदू आहे, माझ्या घराची काळजी घ्या. शाहीन बाग खेल खत्म,' असं लिहिलं. 'माझ्या अंतयात्रेत मला भगवी वस्त्र परिधान करा आणि जय श्रीरामच्या घोषणा द्या', असं स्टेटसही आरोपीने टाकलं होतं.