अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक

जम्मू-काश्मीरसाठी असलेलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. 

Updated: Aug 20, 2019, 10:58 PM IST
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरसाठी असलेलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांकडून काश्मीरच्या बारामुला भागात एनकाऊंटर सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार या भागामध्ये २ दहशतवादी असण्याचा अंदाज आहे. सुरक्षा यंत्रणांनी या सगळ्या भागाला घेरलं आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात आणखी दहशतवादी असण्याचीही शक्यता आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमधली ही चकमक अजून सुरू आहे. सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या संयुक्त अभियानात दोन ते तीन दहशतवादी फसले आहेत. बारामुला भाग राजधानी श्रीनगरपासून ५४ किमी लांब आहे.

दरम्यान काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. 'बारामुलामध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार. संपूर्ण भागाला घेरण्यात आलं आहे.' ५ ऑगस्टला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे. पण काही भागांमध्ये तुरळक दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत.