JammuKashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत आणखी एक जवान शहीद

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

Updated: Aug 18, 2020, 10:50 AM IST
JammuKashmir : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत आणखी एक जवान शहीद title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : मंगळवारी सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीरच्या बारामुल्लातील क्रीरी भागात तैनात असणाऱ्या पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. यामध्ये एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. 

सोमवारी सुरु झालेल्या या कारवाईला रात्रीच्या वेळी काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. या कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे असणाऱ्या क्रीरी गावात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. 

सोमवारपासून सुरु असणाऱ्या या मोहिमेमध्ये सीआरपीएफचे एकूण दोन जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांतील एक स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणजेच एसपीओ शहीद झाले. मंगळवारी या कारवाईदरम्यान आणखी एक जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर आली. परिणामी एकूण शहीदांची संख्या ४ वर पोहोचली आहे. 

मंगळवारी या जवानांना सैन्यानं सलामी देत आदरांजली वाहिली. जम्मू काश्मीरचे ऍडव्हायजर लेफ्टनंट गव्हर्नर आर. आर. भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार चालक कुर्शिद आणि कॉ़न्स्टेबल लवकुश हे दोघंही मुळचे बिहारचे होते. 

 

मागील ४८ तासांमध्ये उत्तर काश्मीरमध्ये संरक्षण दलांवर झालेला हा दुसरा गंभीर हल्ला होता. रविवारी सोपोर भागात दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं होतं.