जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

पर्यटकांनो हे वाचाच... 

Updated: Oct 8, 2019, 07:35 AM IST
जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी
जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी

मुंबई : जम्मू- काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाला गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात पर्यटकांसाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याचे आदेश दिले आहेत. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सदर परिसरातील वातावरणातील सुसूत्रता पाहता पर्यटकांसाठी हा निर्णय म्हणजे एक आनंदाची बातमी ठरत आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परिसरातील परिस्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली जात आहेत. 

२ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार पर्यटकांना जम्मू आणि काश्मीर येथून स्वगृही परतण्याचे आदेश देण्यात आले होते. दहशतवादाचं सावट, संबंधित परिसरात असणारं तणावाचं वातावरण यांमुळेच हे निर्णय घेण्यात आले होते.

नुच्छेद ३७० रद्द करण्याच्या तीन दिवसांपूर्वीच असे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासूनच पर्यटकांनी काही बाबतीत येथील पर्यटनस्तळांवर जाण्याचं प्रमाणही कमी केलं होतं. इतकच नव्हे, तर याचे थेट परिणाम स्थानिकांच्या जीवनशैलीवर झाले होते. 

खुद्द राज्यपालांना दैनंदिन सभा घेत या परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवत अखेर पर्यटकांना माघारी पाठवण्याचा आदेश तातडीने मागे घेण्याचा निर्णय दिला आहे. ऑक्टोबर १० पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

तणावग्रस्त परिस्थिती पाहता ५ ऑगस्टपासूनच जम्मू- काश्मीर येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, शिवाय फुटीरतावादी नेत्यांवरही काही निर्बंध लावण्यात आले होते. पण, सध्या याच निर्बंधापैकी काही राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत.