धुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल

Jammu Kashmir Terror Attack: आताच्या क्षणाची मोठी बातमी. देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर भागामध्ये सध्या नेमकी काय स्थिती? जाणून घ्या संरक्षण यंत्रणांचा मास्टरप्लॅन   

सायली पाटील | Updated: Jul 18, 2024, 11:11 AM IST
धुमसत्या जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद मुळासकट उखडण्यासाठी लष्कराचा मास्टरप्लॅन; वाचून थरकाप उडेल title=
Jammu Kashmir terrorist Attack security forces target terror support networks and infiltration latest updat

Jammu Kashmir Terror Attack: पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाबकडील सीमेतून भारतामध्ये सातत्यानं दहशकवाद्यांची घुसखोरी सुरू असून हे दहशतवादी (Terrorist Attack) सध्या देशात हिंसक कुरापती करताना दिसत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ पाहता आता जम्मू काश्मीरमधील बहुतांश भागांमध्ये स्थानिकही दहशतीच्या वातावरणात वावरताना दिसत आहेत. 

सतत सुरु असणाऱ्या चकमकी, मधूनच होणारे ग्रेनेड हल्ले या सर्व परिस्थितीमुळं सध्या काश्मीरच्या खोऱ्यात अतिशय तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशातील ही स्थिती आणि वाढता दहशतवाद पाहता इथं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं असून, या समस्येचा अतीव गांभीर्यानं विचार करत आता केंद्र आणि लष्करानंही काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं समजत आहे. 

येत्या काळात जम्मू काश्मीरमधून दहशकवादाचा नायनाट करण्यासाठी लष्करानं स्थानिक पोलीस यंत्रणा आणि केंद्राच्या मदतीनं एक मास्टरप्लॅन तयार केला असून, काश्मीरच्या खोऱ्यात सातत्यानं होणारी घुसखोरी रोखण्यासाठी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या जाळ्यालाच समूळ नष्ट करण्याचं ठरवलं आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या लष्कराकडून जम्मूमध्ये सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांना हत्यारं, लष्करी प्रशिक्षण, संपर्क साधण्यासाठी अद्ययावर सुविधा असणाऱ्या यंत्रणा अशी सर्वतोपरी मदत दिली जात आहे. 

इतकंच नव्हे, तर मोठ्या संख्येनं देशाच्या सीमाभागात दहशतवादी सक्रिय असून, ते तुकड्यातुकड्यांनी भारतात घुसखोरी करताना दिसत आहेत. गुप्तरच यंत्रणेच्या माहितीनुसार सध्या पीरपंजाल येथील घनदाट वनांमध्ये असणाऱ्या अनेक गुहांमध्ये सध्या या दहशतवाद्यांना आसरा मिळत असून, काश्मीर खोऱ्यातील काही स्थानिकांना बंदुकीचा धाक दाखवत हे दशतवादी त्यांचीसुद्धा मदत घेताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : '...म्हणून मोदींनी तात्काळ गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा घ्यायलाच हवा', 'मोदींनी युक्रेन-रशिया युद्धात..'

दहशतवादाची ही एकंदर पाळंमुळं पाहता आता पुंढ, केरन आणि इतर सर्वच क्षेत्रांमध्ये लष्करानं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या ओवरग्राऊंड कार्यकर्ता आणि समर्थकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. जिथं या मंडळींकडून दहशकवाद्यांसंदर्भातील माहिती, त्यांचे तळ, त्यांना मिळणाऱ्या रसदीचा स्त्रोत या साऱ्यासंदर्भातील माहिती मिळवत या समस्येचा मुळापासून खात्मा करण्यासाठी आता भारतीय लष्करानं कंबर कसली आहे. यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नसून गरज नसताना कोणावरही दयाही दाखवली जाणार नाहीय, त्यामुळं आता या कारवाईवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

दहशतवादी हल्ल्याचं सत्र सुरूच... 

मागील काही दिवसांचा आढावा घेतल्यास दहशतवादी कारवायांनी अनेक अडचणी वाढवल्या आहेत. 4 मे रोजी पूंछमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात वायुदलाचा जवान शहीद झाला, 9 जून रोजी रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 जण मृत्युमुखी पडले, 11 जून रोजी कठुआमधील चकमकीत 1 जवान शहीद झाला, एप्रिलमध्येही अतिरेक्यांनी 2 जणांची हत्या केली. एकच आठवड्यापूर्वी 8 जुलै रोजी कठुआमध्ये लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. त्यानंतर सोमवारी पुन्हा कॅप्टन ब्रजेश थापा यांच्यासह चार जवान दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले होते.