श्रीनगर : जम्मू- काश्मीर परिसरातील उरी येथे असणाऱ्या सैन्यदलाच्या तळाळील परिसरामध्ये रविवारी रात्री काही संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या. ज्यानंतर दोन संशयास्पद व्यक्तींचा वावर या परिसरात पाहण्यात आल्याचं म्हटलं जात असून, या परिसरावर सैन्यदलाकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. उरी येथील सैन्यदलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर या परिसरात कायमच सतर्कतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीलासुद्धा या भागातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
J&K: Visuals from Rajarwani, Uri where suspicious movement was detected around camp of Army Artillery unit last night following which a security personnel opened fire. Area cordoned off&is being searched by Police&Army. 2 ppl being examined.(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/S9oEgVnawZ
— ANI (@ANI) February 11, 2019
'झी न्यूज'च्या वृत्तानुसार रविवारी रात्री राजारवानी सेना आर्टिलरी युनिट (१९ वी तुकडी) येथे संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून गोळीबार करण्यात आला. ज्यानंतर पुढील काही वेळ या भागात गोळीबाराचा आवाज येत होता. या कारवाईमध्ये आतापर्यंत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं कळत आहे. पण, त्याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित परिसरात सैन्यदलाकडून शोधमोहिम सुरू असून, ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी सुरु असल्याचंही म्हटलं जात आहे.
रविरवारीही सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाम येथे चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. जेथे सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्यदलाला यश मिळालं. जवळपास सहा तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कारवाईमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. दरम्यान, संबंधित परिसरामध्ये सुरभेच्या कारणावरून काही वेळासाठी मोबाईल आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या.