मुंबई :Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना होय. या योजनेतून आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोक सामील झाले आहेत.
18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये, वयाच्या 60 वर्षांनंतर व्यक्तीला पुढील आयुष्यभर 3000 रुपये पेन्शन मिळत राहील. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जन धन खातेधारकांनाही या योजनेअंतर्गत पेन्शन मिळू शकते.
या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की मुख्यतः घरचे कामगार, रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर यांना ही योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ अशा कामगारांना दिला जातो ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नाही.
या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळेल. जे EPFO, NPS किंवा ESIC चे सदस्य आहेत, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी व्यक्तीने आयकर भरला तरी तो या योजनेसाठी पात्र नाही.
जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षे असेल, तर त्याला 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 रुपये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत जमा करावे लागतील. जर एखाद्याचे वय 29 वर्षे असेल तर त्याला योजनेत पेन्शन मिळण्यासाठी वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा 100 रुपये जमा करावे लागतील.
जर एखादा कर्मचारी वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सामील झाला तर त्याला दरमहा 200 रुपये योगदान द्यावे लागेल. यात विशेष म्हणजे जेवढे योगदान खातेदाराचे आहे तेवढेच योगदान सरकारही आपल्या वतीने देणार आहे.
पीएम श्रम योगी मानधन योजनेसाठी, आधार कार्ड आणि बचत खाते / जन धन खाते (IFSC कोडसह) फक्त दोन कागदपत्रे आवश्यक आहेत. म्हणजेच तुमचे जन धन खाते असले तरी तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला वेगळे बचत खाते उघडण्याची गरज नाही.
पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी, जवळच्या CSC केंद्राला भेट द्या.
आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते जे काही असेल ते IFSC कोड सोबत द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल.
खाते उघडण्याच्या वेळी नॉमिनी देखील प्रविष्ट केला जाऊ शकतो.
तुमचा तपशील संगणकात टाकल्यानंतर, मासिक योगदानाची माहिती आपोआप प्राप्त होईल.
यानंतर, तुम्हाला तुमचा पहिला हफ्ता रोख स्वरूपात द्यावा लागेल.
यानंतर तुमचे खाते उघडले जाईल आणि श्रम योगी कार्ड उपलब्ध होईल.
1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही या योजनेची माहिती मिळवू शकता.