१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला

कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला 

१९९७ चा घाव विसरून देवेगौडांनी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. तरी ११२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं देवेगौडांच्या जेडीएसला पाठिंबा दिला आहे. जेडीएसनंही काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला आहे. पण भारतीय राजकारणाचा इतिहास बघितला तर १९९७ मध्ये मात्र या दोन पक्षांमुळे भारताचं राजकारण ढवळून निघालं होतं.

काय झालं होतं १९९७मध्ये? 

१ जानेवारी १९९६ ला देवेगौडा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. देवेगौडा हे देशाचे ११वे पंतप्रधान होते. काँग्रेस, डावे आणि १४ पक्षांच्या ३१८ खासदारांनी देवेगौडा यांना पाठिंबा दिला होता. १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपला या निवडणुकीत १६१ तर काँग्रेसला १४० जागा मिळाल्या. जनता दलाला ४६ आणि डाव्या पक्षांना ४४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. प्रादेशिक पक्षही १०० जागांवर जिंकले होते. १९९६ साली कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं तरी राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पण भाजपला बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे वाजपेयींची सरकार पडलं. काँग्रेसला पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं नसल्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेसनं देवेगौडांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा दिला आणि देवेगौडा यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

१० महिन्यांमध्ये पडलं देवेगौडांचं सरकार

१९९७ साली १० महिन्यांचं पंतप्रधानपद भुषवल्यानंतर देवेगौडा यांचं सरकार पडलं होतं. त्यावेळी काँग्रेसनं पाठिंबा काढल्यामुळे देवेगौडा यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं. देवेगौडा यांचं सरकार पडलं तेव्हा सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. मार्च १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी देवेगौडांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला. महत्वाचे राजकीय निर्णय घेताना देवेगौडा काँग्रेसशी सल्लामसलत करत नाहीत, असा आरोप सीताराम केसरी यांनी केला होता. मायावतींना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा द्या आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल रोमेश भंडारी यांची गच्छंती करा अशी मागणी काँग्रेसनं केली होती पण देवेगौडा यांनी ही मागणी मान्य केली नाही आणि म्हणूनच काँग्रेसनं देवेगौडांचा पाठिंबा काढल्याचं बोललं जातं.

२१ वर्षानंतर हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकत्र येत आहेत. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. जुनी कटुता विसरून सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत.