जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त, मेहबुबांचा सरकार स्थापन्याचा दावा

जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे.  

PTI | Updated: Nov 21, 2018, 10:27 PM IST
जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त, मेहबुबांचा सरकार स्थापन्याचा दावा

श्रीनगर : जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. दरम्यान, त्याचवेळी विधानसभा बरखास्त करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपल्याला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरसचा पाठिंबा असल्याचे सांगत सरकार स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे आता येथे पुन्हा नवे सरकार स्थापन होणार का, याची उत्सुकता लागलेय. दरम्यान, भाजपने  मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर येथील सरकार कोसळले होते.

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी विधानसभा बरखास्त केली. संविधानाच्या कलम ५३ नुसार जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त केल्याची माहिती राजभवनकडून देण्यात आली. त्याधी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांना पत्र लिहून आपल्याला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरसचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यांना एकूण ५६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुफ्ती यांनी सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर १५ मिनिटानंतर पिपल्स कॉन्फरसनेही भाजपचा आपल्याला पाठिंबा असून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे राज्यपाल कोणाला बोलविणार याची चर्चा सुरु झालेय.

पीडीपी हा राज्यातील मोठा पक्ष आहे. आमच्याकडे २९ आमदार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा आहे. नॅशनल कॉन्फ्रन्सचे १५ आणि काँग्रेसचे १२ आमदार आहेत. सर्व मिळून आमची संख्या ५६ होते. मी श्रीनगरमध्ये आहे. परंतु आपली भेट घेणे मला सध्या शक्य नाही. हे पत्र देऊन मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही सरकार स्थापनेच्या दावा करण्यासाठी आपणाला लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे, असे माजी मुख्यमंत्री मुफ्ती यांनी पत्रात म्हटले आहे.

तर दुसरीकडे नॅशनल कॉन्फ्रेसचे अध्यक्ष सज्जाद यांनी राज्यपालांच्या खासगी सचिव जीवन लाल यांना व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या पत्राचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केलाय.  भाजपचा आम्हला पाठिंबा असून इतर १८ आमदारांचाही आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.