नवी दिल्ली : कमलेश तिवारी हत्येप्रकरणी लखनऊ पोलिसांना मोठं यश मिळालयं. पश्चिम भागात खालसा इन या हॉटेलमध्ये एका खोलीत भगवं कापड आणि बॅग सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तातडीनं पोलिसांनी खालसा इन हॉटेलमध्ये धाव घेतली. परिस्थितीजन्य पुरावे, उच्च अधिकाऱ्यांनी तपास केला. त्यानंतर इथे सापडलेलं कापड अपराध्यांच्या अंगावर होतं असं पोलिसांचं म्हटले आहे. झी मीडियाला पोलिसांनी ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे.
लखनऊत शुक्रवारी हिंदू समाज पार्टीच्या कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर आली आहे. नागपुरातून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने गुजरातमधील सूरतमधून दोघांना अटक केली होती. सूरतमधून अटक झालेल्यांच्या माहितीवरून महाराष्ट्र एटीएसने नागपुरात एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. त्याचा या हत्या प्रकरणात सहभाग होता किंवा नाही, होता तर काय सहभाग होता हे चौकशी नंतरच स्पष्ट होणार आहे.
कमलेश तिवारी हत्याकांडाप्रकरणी २४ तासांच्या आत आरोपींपर्यंत पोहचल्याचा दावा पोलिसांनी केलाय. २३ वर्षीय रशीद पठाण मुख्य आरोपी असल्याचं उत्तरप्रदेश पोलीस म्हणतायत. उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी काल लखनऊत पत्रकार परि्षद घेतली. याप्रकरणी रशीद खान अहमद पठाण, मौलाना महोसिन शेख आणि फैजानला सुरतमधून अटक केलीय. पण सीसीटीव्हीत चित्रित झालेले आरोपी अजून अटकेत नाहीयेत.
हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्यावर धारदार आणि टोकदार हत्यारांनी तब्बल १३ सपासप वार तसेच गोळी झाडण्यात आली. या हत्येप्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कमलेश तिवारी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. कमलेश तिवारी यांच्या नातेवाईकांची ५ कालिदास मार्गावरील निवासस्थानी ही भेट होणार आहे. यावळे हिंदु महासभेचे कार्यकर्ते देखील सोबत असतील.