'विकेण्डच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य संस्कृती! आपण कंटाळलेले..'; भारतीयांना कंगनाचा अजब सल्ला

Kangana Ranaut On Work Culture: कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या कंगनाची ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 12, 2024, 09:43 AM IST
'विकेण्डच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य संस्कृती! आपण कंटाळलेले..'; भारतीयांना कंगनाचा अजब सल्ला title=
कंगनाची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

Kangana Ranaut On Work Culture: अभिनेत्री आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडून आलेली खासदार कंगना राणौतने भारतीय कर्मचाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. भारताला देश म्हणून पुढे घेऊन जायचं असेल तर भारतीयांनी ते करत असलेल्या कामाच्या पूर्णपणे प्रेमात पडलं पाहिजे, असं कंगनाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर करत कंगाने हे मत व्यक्त केलं आहे.

कंगना चर्चेत

कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून 74 हजारांहून अधिक मतांनी जिंकल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. निवडणुकीसाठी तिला तिकीट मिळाल्यानंतर तिने जोरदार प्रचार केला. जिंकून आल्यानंतर चंदीगढ विमानतळावर तिला कानशीलात लगावण्यात आल्याच्या प्रकरणामुळेही ती चर्चेत राहिली. त्यानंतर मोदींच्या शपथविधीला लावलेली उपस्थिती, खासदार म्हणून मिळालेल्या ओळखपत्राबरोबरचा फोटो यासारख्या गोष्टींमुळे कंगना चर्चेत आहे. असं असतानाच आता तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीेने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कंगनाने नेमकं काय म्हटलं आहे?

कंगनाने शेअर केलेल्या मोदींच्या व्हिडीओमध्ये ते देशासाठी आपण 24x7 काम करण्यास तयार असल्याचं सांगत आहेत. कंगाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने, "आपण झपाटून काम करण्याची पद्धत सामान्यपणे स्वीकारली पाहिजे. विकेण्डची वाट पाहत बसणे आपण थांबवलं पाहिजे. सोमवारी कामावर जावं लागतं यासंदर्भातील मिम्स शेअर करत केलं जाणारं रडंगाणंही थांबवलं पाहिजे. (विकेण्ड आणि आठवड्याच्या सुट्ट्या) ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपण असे कंटाळलेले आणि आळसलेले राहून चालणार नाही. आपण अजून विकसित देश झालेलो नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. " असं म्हटलं आहे.

यापूर्वी नारायण मूर्तींनीही केलेलं असेच विधान

यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. मात्र मूर्ती यांच्या विधानावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याबरोबर थ्री वन फोर कॅपिटल्सच्या 'दर रेकॉर्ड' या पॉडकास्टवर बोलताना मूर्ती यांनी हे विधान केलं होतं. वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांची स्पर्धा सुरु असतानाच देशातील तरुणांनी देशाला या स्पर्धेत आघाडीवर ठेवण्यासाठी अधिक तास काम केलं पाहिजे, असं मूर्ती म्हणाले होते. "भारतामधील कामासंदर्भातील प्रोडक्टीव्हीटी ही जगात सर्वात कमी आहे. आपण आपल्या कामाची प्रोडक्टीव्हीटी वाढवली नाही तर आपल्याला इतर देशांबरोबर प्रगतीच्याबाबतीत मागे राहू. चीन, जपान या सारख्या वेगाने अर्थव्यवस्था वाढत असलेल्या देशांबरोबर स्पर्धा करण्यासाठी आपल्याला आपल्या कामाची प्रोडक्टीव्हीटी वाढवायला हवी. त्यामुळेच मी तरुणांना विनंती करेन की त्यांनी, 'हा माझा देश आहे, मी आठवड्यातील 70 तास काम करेन' असं म्हणायला हवं," असं विधान मूर्ती यांनी केलं होतं.