नवी दिल्ली : पाकिस्तानने आज दावा केला आहे की, त्यांनी भारताचे २ विमानं पाडली आणि एक पायलट त्यांच्या ताब्यात आहे. त्यांचा हा दावा किती खरा आहे याचा तपास सुरु आहे. पण अशीच गोष्ट 20 वर्षापूर्वी कारगिल युद्धाच्या वेळी घडली होती. पाकिस्तानने भारताच्या एका फायटर जेट पायलटला ताब्यात घेतलं होतं. नचिकेता असं त्या पायलटचं नाव होतं. नचिकेता हा शत्रूंच्या ताब्यातून कसा भारतात परतला याची एक वेगळी गोष्ट आहे.
3 जून 1999 ला कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुदलाच्य़ा लढाऊ विमानाचा पायलट नचिकेताला 'ऑपरेशन सफेद सागर'मध्ये MIG 27 उडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी नचिकेताचं वय 26 वर्ष होतं. नचिकेताने शत्रूंच्या जवळ जाऊन 17 हजार फूटावरुन रॉकेट सोडले. शत्रूच्या कॅम्पवर त्याने हल्ला केला. पण या दरम्यान विमानाचं इंजिन खराब झालं आणि विमानाला आग लागून विमान क्रॅश झालं.
नचिकेता विमानातून सुरक्षित बाहेर आला. पण तो पीओकेमध्ये अडकला. पाकिस्तानच्या सैन्याने त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर पाकिस्तानने त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. पाकिस्तानी आर्मी त्याच्याकडून भारतीय आर्मीची गुप्त माहिती विचारण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने काहीच सांगितलं नाही.
नचिकेताने म्हटलं की, मला खूप वाईट पद्धतीने मारहाण केली गेली. विमान क्रॅश झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी चालवली. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दबाव वाढला. ज्यामुळे ८ दिवसातच पाकिस्तानच्या आर्मीने नचिकेताला इंटरनॅशनल कमेटी ऑफ द रेड क्रॉसला सोपवलं. त्यानंतर नचिकेताला वाघा बॉर्डरवरुन भारतात पाठवण्यात आलं.
तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. कारगिल युद्ध 26 जुलै 1999 ला संपलं होतं. नचिकेताला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी मेडल देऊन गौरवण्यात आलं.
नचिकेताने पुण्याच्या खडकवासला नॅशनल अॅकेडमीमधून प्रशिक्षण घेतलं होतं. नचिकेता 1990 ते 2017 पर्यंत देशाच्या सेवेत होता. भारतीय वायुदलात नचिकेता ग्रुप कॅप्टन देखील होते.
कारगिल युद्धादरम्यान जखमी झाल्याने त्यांना फायटर विमानांमध्ये जातांना त्रास होत होता. पण तरीही त्यांनी प्रयत्न नाही सोडले. त्यानंतर ते विशाल Il-76 ट्रासपोर्ट विमान चालवत होते. त्यांनी म्हटलं होतं की, 'पायलटचं हृदय हे नेहमी एका विमानाशी जोडलेलं असतं.'