...अन् मुख्यमंत्र्यांनी 'तो' शापित दरवाजा उघडला; कित्येक वर्षांपासून 'वास्तूदोषा'मुळे होता बंद

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) शनिवारी अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यासाठी विधानसभेतील आपल्या कार्यालयात जात होते. यावेळी त्यांनी दक्षिणाभिमुख दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना हा दरवाजा उघडण्यास सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 26, 2023, 08:51 AM IST
...अन् मुख्यमंत्र्यांनी 'तो' शापित दरवाजा उघडला; कित्येक वर्षांपासून 'वास्तूदोषा'मुळे होता बंद title=

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी शनिवारी विधानसभेचा दक्षिणाभिमुख दरवाजा उघडला. हा दरवाजा गेल्या कित्येत वर्षांपासून बंद होता. वास्तूदोषामुळे हा दरवाजा काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी तात्काळ हा दरवाजा उघडण्यास सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी त्याच दरवाजातून प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

मुख्यमंत्री सिद्धरमय्या विधानसभेतील आपल्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांश अन्न भाग्या योजनेवर चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी पाहिलं तर विधानसभेचा दक्षिणाभिमुख दरवाजा बंद होता. त्यांनी चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दक्षिणाभिमुख दरवाजा अशुभ मानला जात असल्याने तो उघडला जात नाही. यानंतर सिद्धरमय्या काही वेळासाठी दरवाजाच्या समोर उभे राहिले आणि नंतर अधिकाऱ्यांन दरवाजा उघडण्याचा आदेश दिला. आपल्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर सिद्धरमय्या यांनी 'वास्तू'ची आपली व्याख्या सांगितली. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जिथे तुमच्या निरोगी मेंदू, स्वच्छ ह्रदय यांना स्थान मिळतं तीच चांगली वास्तू आहे. यामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि ताजी हवा आली पाहिजे. दरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितलं की, याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्याने हा दक्षिणाभिमुख दरवाजा उघडण्याची हिंमत केली नाही.

मुख्यमंत्र्यांनी दरवाजाने केला प्रवेश 

ट्विटरला शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत मुख्यमंत्री आपल्या कर्मचाऱ्यांना हा दक्षिणाभिमुख दरवाजा बंद का आहे? असं विचारत असल्याचं दिसत आहे. त्यावर कर्मचारी वास्तूदोषामुळे बंद आहे असं सांगतात. यानंतर ते याच दरवाजाने आत प्रवेश करतात.

दरम्यान या व्हिडीओवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्र्यांना अंधविश्वास दूर केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. 

शनिवारी झालं होतं या दरवाजाचं उद्घाटन

अधिकाऱ्याने सांगितलं की, माझ्या माहितीनुसार कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी हा दरवाजा कधी उघडला नाही. ते आपल्या राजकीय करिअरसाठी या दरवाजाला अशुभ मानत होते. असंही सांगितलं जातं की, या दक्षिणाभिमुख दरवाजाचं उद्घाटन शनिवारी झालं होतं. अशात हे आयुष्यात दु:ख येण्याचं कारण ठरु शकतं अशी शंका निर्माण होत होती. 

तत्कालीन मुख्यमंत्री जे एच पटेल यांना निवडणुकीत अपयश आल्यानंतर 1999 मध्ये या दरवाजाला टाळं ठोकण्यात आलं होतं. 2013 मध्ये सिद्धरमय्या यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा दरवाजा उघडला होता. पण 2018 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तो पुन्हा बंद झाला होता.