Karnataka Election 2023: सध्या कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुकीची रण धुमाळी सुरु आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपच्या ताब्यात आहे. यामुळेच येथे पुन्हा सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये प्रचार करत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रसने देखील येथे मुक्काम ठोकला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचार करत आहेत. दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. प्रचाराचा वेग वाढला असतानाच कर्नाटक निवडणुक चर्चेत आली आहे ते श्रीमंत उमेदवाराच्या मालमत्तेमुळे. रेड्डी ब्रदर्स यांची संपत्ती कुबेरालाही लाजवेल अशी आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रेड्डी ब्रदर्स यांचा कल्याण राज्य प्रगति पक्ष चांगलाच चर्चेत आला आहे. खाण व्यावसायिक असलेल्या रेड्डी ब्रदर्स यांच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे फिरत आहेत. जी जनार्दन, करुणाकर आणि सोमशेखर रेड्डी हे रेड्डी ब्रदर्स त्यांच्या लग्जरी लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची संपत्ती पुन्हा एकदा चर्चत आली आहे ते जी जनार्दन यांनी निवडणुक अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे. प्रतिज्ञापत्रात जी जनार्दन यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माहिती जाहीर केली आहे.
जी जनार्दन यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीनुसार यांच्याकडे 84 किलो सोने आणि हिरे आहेत. जनार्दन यांच्याकडे 2.15 कोटींचे सोन्याचे सिंहासन देखील आहे. 250 कोटींची संपत्ती असलेले जनार्दन त्याच्या इतर दोन भावांप्रमाणे अत्यंत आलिशान आयुष्य जगतात.
जी जनार्दन यांच्याकडे सोन्याचे शर्ट देखील आहेत. तसेच त्यांच्याकडे 13 लाखांच्या सोन्याचा बेल्ट देखील आहे. जनार्दन या दागिन्यांचे खास कलेक्शन आहे. जनार्दन यांच्याकडे सोन्याच्या आणि प्लॅटिनमच्या मिळून जवळपास 1200 अंगठ्या आहेत. याशिवाय सोन्याच्या 600 बांगड्या, सोन्याचे आणि हिऱ्याचे अनेक हार तसेत सोन्याचे आणि हिऱ्याचे 300 झुमके आहेत. याशिवाय घरात सध्या असलेल्या क्रॉकरीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे. रेड्डी बंधूंनी तिरुपती मंदिरात 43 कोटी रुपयांचा हिऱ्यांनी जडलेला हार अर्पण केला होता. याशिवाय आपल्या मुलीच्या लग्नात त्यांनी 500 कोटींचा खर्च केला होता. यामुळे ते चर्चत आले होते.
केवळ मौल्यवान दाग दागिनेच नाही तर रेड्डी ब्रदर्स यांचे लाईफस्टाईल देखील अत्यंत अलिशान असे आहे. त्यांच्याकडे अलिशान कार्सचे कलेक्शन आहे. यात रोल्स रॉयससोबत रेंज रोव्हर, लँड रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि डझनभर स्कॉर्पिओ-बोलेरो अशा अनेक अलिशान कार्सचा समावेश आहे. त्यांची स्वतःची कस्टमाइज बस आहे. याशिवाय त्यांचे खासगी हेलिकॉप्टर देखील आहे. घराबाहेरच त्यांनी हॅलीपॅड देखील बांधले आहे.