लाचखोरी प्रकरणात भाजपच्या जनार्दन रेड्डींना अटक

रेड्डी हे भाजप सरकारच्या काळात मंत्री होते.

Updated: Nov 11, 2018, 04:53 PM IST
लाचखोरी प्रकरणात भाजपच्या जनार्दन रेड्डींना अटक title=

बंगळुरू: केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) रविवारी अँबिडेंट लाचखोरी प्रकरणात कर्नाटकमधील भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी आणि त्यांचा सहकारी अली खान यांना अटक केली. खाणसम्राट असलेल्या रेड्डी बंधूंचा कर्नाटकच्या राजकारणात दबदबा आहे. त्यामुळे या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. सीसीबीने रेड्डी यांना ताब्यात घेतल्यानंतर तब्बल तासभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

जनार्दन रेड्डी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला पैशांची अवैध पद्धतीने देवाणघेवाण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. रेड्डी यांना सबळ पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आल्याचे केंद्रीय गुन्हे शाखेचे आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितले. 

रेड्डी हे भाजप सरकारच्या काळात मंत्री होते. या काळात अँबिडेट मार्केटिंग या कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार सक्तवसुली संचलनालयाकडून कारवाई होणार होती. ही कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात रेड्डी यांनी अँबिडेट मार्केटिंगकडून सोन्याच्या रुपात २० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. 

अँबिडेट मार्केटिंगने पैसै दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून तब्बल १५ हजार लोकांना ६०० कोटींचा चुना लावला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना जनार्दन रेड्डी सीबीसीच्या रडारवर आले होते. अधिक तपास केला असता अँबिडेट कंपनीचे संस्थापक सय्यद अहमद फरीद यांनी आपल्या कंपनीवरील कारवाई टाळण्यासाठी जनार्दन रेड्डींना लाच दिल्याचे निष्पन्न झाले. सोन्याच्या रुपात रेड्डींना तब्बल २० कोटी रुपयांची लाच मिळाली होती. 

फरीद यांनी रेड्डी समूहाशी संबंधित असलेल्या राजमहाल फॅन्सी ज्वेलरकडे हे सोने दिले होते. त्यांच्याकडून हे सोने रेड्डींपर्यंत पोहोचवण्यात आले. या सगळ्यात रेड्डींचा सहकारी अली खान याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.