NIA चे पथक स्फोटाच्या तपासासाठी पुलवामात जाणार; दिल्लीतील घडामोडींना वेग

या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता.

Updated: Feb 15, 2019, 08:29 AM IST
 NIA चे पथक स्फोटाच्या तपासासाठी पुलवामात जाणार; दिल्लीतील घडामोडींना वेग title=

नवी दिल्ली: दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता. या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर फिदाईन दहशतवाद्याने ही कार सीआरपीएफच्या बसवर नेऊन आदळली. या स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबारही केला. 

हा गेल्या तीन वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल सातत्याने पुलवामातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

लाईव्ह अपडेटस