नवी दिल्ली : काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी एन्काऊंटरनंतर भडकलेल्या हिंसेमध्ये दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. यावर बोलताना आर्मी चीफ जनरल बिपिन रावत यांनी काश्मीरी तरुणांना सल्ला दिलाय. काश्मीरी तरुणांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की जर तुम्ही एखाद्या 'स्वातंत्र्या'ची कल्पना करत असाल तर तसं काहीही होणार नाही... स्वातंत्र्याची कल्पना एक मिथ्य आहे... कारण तुम्ही आमच्या सेनेसोबत लढू शकत नाहीत. खोऱ्यात एक असिस्टंट प्रोफेसरच्या दहशतवादी बनण्यावर आणि एन्काऊंटरमध्ये मारल्या गेल्यासारख्या घटनांवर चिंता जाहीर करताना जनरल बिपिन रावत यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये या विषयावर भाष्य केलंय.
'काश्मीरी तरुणांनी बंदुकी हातात घेणं ही निश्चितच चिंतेची बाब आहे... आणि आज जे लोक त्यांना हा रस्ता स्वातंत्र्याकडे जातो असं सांगत आहेत ते त्यांना भ्रमित करत आहेत... मी काश्मीरी तरुणांना सांगू इच्छितो की 'स्वातंत्र्य' शक्य नाही... असं कधीच होणार नाही... तुम्ही बंदूक का उचलत आहात? आम्ही नेहमी त्यांच्याशी लढत राहू जे स्वातंत्र्याची स्वप्न पाहत आहेत... स्वातंत्र्यासारखं आता कधीही होणार नाही' असं बिपिन रावत यांनी म्हटलंय.
'सेनेसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये किती दहशतवादी ठार झाले याला मी महत्त्व देत नाही... याचं कारण म्हणजे हे चक्र किती काळासाठी सुरू राहील हे सांगता येणार नाही. नव्या दहशवाद्यांची भरती होतच राहणार... मी फक्त ठासून एवढचं सांगू इच्छितो की यामुळे हाती काहीही लागणार नाही... तुम्ही सेनेसोबत लढू शकत नाहीत' असंही रावत यांनी म्हटलंय.