केरळ : केरळच्या प्रसिद्ध शबरीमला मंदिरात काल पहाटे बिंदू आणि कनक दुर्गा या दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर वादंग निर्माण झाला. यानंतर तात्काळ मंदिर शुद्धीकरण करण्यात आले. हा वाद इथेच थांबला नाही. स्थानिक तसेच हिंदू कट्टरतावद्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांच्या प्रवेशाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शबरीमलामध्ये आंदोलन करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासोबत 2 सीपीआयएम कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये चंदन उन्नीथन या शबरीमला कर्म समितीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.
चंदन उन्नीथन या शबरीमला कर्म समितीच्या कार्यकर्त्याने शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाचा विरोध केला. बुधवारी सीपीआयएम आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. आजही अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी केरळ बंदची हाक दिली आहे. देव अय्यपा यांच्या या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटाच्या महिलांना प्रवेश बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही परंपरा खंडीत करत याविरोधात निर्णय दिला. याला भारतीय जनता पार्टी आणि हिंदू संघटनांनी खूप विरोध केला. बुधवारी राज्य सचिवालयाबाहेर साधारण 5 तास वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. मात्र स्थानिक तसेच कट्टर हिंदुत्ववाद्यांचा याला कडाडून विरोध आहे. बिंदू आणि कनकदुर्गा या साधारण चाळीशीच्या महिलांनी शबरीमला मंदिरात सकाळी 3 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास प्रवेश केला. 10 ते 50 वयोगटातील महिलांना या मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे. पण ही बंदी झुगारून या महिलांनी हा प्रवेश केल्याने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अय्यपा देवाचे दर्शन घेऊन या दोघी परतल्या. या संदर्भातील व्हिडीओ समोर आला असून यावरुन याचे पडसाद आता केरळ बंदच्या रुपात पाहायला मिळत आहेत.