तिरुवनंतपूरम : दिवसेंदिवस झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यात एका राज्याला यश आलं आहे. या राज्यासाठी आजचा आणखी एक दिवस असा होता की एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी या राज्यात भारतातला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. पण राज्य सरकारने जगभरात डोकेदुखी ठरलेले कोरोनाचं संकट असं हाताळलं की प्रशासनाचं काम कौतुकास्पद आहेच, पण देशातल्या अन्य राज्यांसाठीही ते आदर्श आहे.
ही यशोगाथा आहे केरळची. केरळमध्ये आज एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आज एकाच दिवशी ६१ जण कोरोनामुक्तही झाले. आणि आता राज्यात केवळ ३४ कोरोनाचे रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
केरळमध्ये जानेवारीच्या अखेरीस भारतातला पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. हा रुग्ण चीनच्या वुहानमधून आला होता. भारतात कोरोना व्हायरसचे आगमन झाल्याने संपूर्ण देश केरळकडे पाहात होता. पण केरळ सरकार जागं झालं आणि पुढचे तीन महिने सतर्क राहून आणि नियोजनबद्ध उपाययोजना केल्या. एकवेळ अशी होती केरळ राज्य कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर होते. पण महिनाभरात कठोर उपाययोजनांमुळे केरळमध्ये रुग्णांची संख्या ५००च्या आत रोखण्यात सरकारला यश आलं.
#COVID19 Update | May 4
No new cases.
61 recoveries.
Active cases down at 34.No new hotspots
21,724 under observation
33,010 samples tested; 32,315 -ve
2431 samples covered sentinel surveillance pic.twitter.com/2WgdFjc2Z5— CMO Kerala (@CMOKerala) May 4, 2020
आतापर्यंत केरळमध्ये कोरोनाचे ४९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातील केवळ तीन जणांचा मृत्यू झाला. तर आता केवळ ३४ जणांवर उपचार सुरु आहेत. इतर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केरळमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही अशी नोंद गेल्या काही दिवसांत होऊ लागली आहे. सध्या केरळमध्ये २१ हजार ७२४ जण असे आहेत की त्यांच्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत राज्यात ३३ हजार १० जणांची सॅम्पल टेस्ट करण्यात आली. त्यात केवळ ४९९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
ज्या केरळमध्ये कोरोनाचा देशातला पहिला रुग्ण आढळला होता आणि जे राज्य महिनाभरापूर्वी देशात दुसऱ्या क्रमांकावर होते ते आता १९ व्या क्रमांकावर गेले आहे.