लखनऊ : देशातील पहिली कॉरपोरेट 'तेजस' ट्रेन (Tejas Train) लखनऊ ते दिल्ली मार्गावरुन धावण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सकाळी 'तेजस'ला हिरवा कंदिल दाखवला. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून लखनऊ आणि नवी दिल्लीदरम्यान 'तेजस' एक्स्प्रेस मंगळवार वगळता आठवड्यातून ६ वेळा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'ही देशातील पहिली कॉरपोरेट ट्रेन आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देत इतर शहरांनाही जोडण्यासाठी अशाप्रकारचे प्रयत्न केले जावेत' असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
Lucknow: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath flags off Lucknow-Delhi Tejas Express; says,"It is the first corporate train of the country. I congratulate the first batch of passengers travelling in it & hope such initiatives are taken to connect other cities also" pic.twitter.com/xFEnomW6UA
— ANI UP (@ANINewsUP) October 4, 2019
महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत, 'आयआरसीटीसी'कडून 'तेजस'मध्ये प्रवाशांच्या मदत आणि कॅटरिंग सर्व्हिससाठी केवळ महिला कर्मचारी असण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या एका क्लिकवर 'तेजस' हॉस्टेस मदतीसाठी हजर असणार आहेत.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विम्यासह, ट्रेन उशीरा आल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ट्रेन १ तास उशिरा आल्यास प्रवाशांना १०० रुपये भरपाई तर २ तासांहून अधिक उशिर झाल्यास प्रत्येक प्रवाशाला २५० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लखनऊ ते दिल्लीसाठी एसी चेयर कारचे तिकीट १ हजार १२५ आणि एक्झिक्यूटिव्ह चेयर कारचे तिकीट २ हजार ३१० रुपये आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये -
ट्रेनमध्ये व्यक्तिगत एलसीडी इंटरटेनमेंट-कम-इंफोर्मेशन स्क्रीन, ऑन बोर्ड वाय-फाय सेवा, आरामदायी आसन व्यवस्था, मोबाईल चार्जिंग, व्यक्तिगत रिडिंग लाइट्स, मोड्युलर बायो-टॉयलेट, सेन्सर टॅप फिटिंगची सुविधाही देण्यात आली आहे. तेजसमध्ये जवळपास ७५८ प्रवाशी प्रवास करु शकतात.