देशाची सुरक्षा करणाऱ्या निमलष्करी दलांबद्दल जाणून घ्या

परकीय शत्रूंशी लढा देणे आणि देशांतर्गत सुरक्षा ही जबाबदारी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजेच सीएपीएफ यांची असते.

Updated: Feb 22, 2019, 08:06 PM IST
देशाची सुरक्षा करणाऱ्या निमलष्करी दलांबद्दल जाणून घ्या

अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना हौतात्म्य आलं. त्यानिमित्ताने निमलष्करी दलांची माहिती घेऊया. देशाच्या संरक्षणासाठी लष्करी दलं असतात. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत भूदल (आर्मी), वायुदल (एअरफोर्स) आणि नौदल (नेव्ही) कार्यरत असतात. देशाच्या संरक्षणाचं काम ही तीन दलं करतात. तर परकीय शत्रूंशी लढा देणे आणि देशांतर्गत सुरक्षा ही जबाबदारी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजेच सीएपीएफ यांची असते. सीएपीएफ म्हणजेच भारताची निमलष्करी दलं. ही दलं केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत येतात. 

सीएपीएफच्या अंतर्गत खालील सुरक्षा बले येतात.

आसाम रायफल्स 
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)
सेंट्रल इंडस्ट्रीअल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)
सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ)
इंडो तिबेटन पोलीस फोर्स (आयटीबीपी)
नॅशनल सिक्युरिटी गार्डस् (एनएसजी)
सशस्त्र सेना बल (एसएसबी)

आसाम रायफल्स- 

देशातले सर्वात जुने निमलष्करी दल. 1835 साली ब्रिटीशांनी कॅशर लेव्ही या दलाची स्थापना केली. त्यानंतर अनेकदा आसाम रायफल्सची नावं बदलली गेली. 1883 साली आसाम फ्राँटीयर पोलीस, 1981 साली आसाम मिलिटरी पोलीस, 1913 साली पूर्व बंगाल आणि आसाम मिलिटरी पोलीस आणि 1917 साली आसाम रायफल्स असं या दलाचं नामकरण झालं. पहिल्या महायुद्धात युरोप आणि आखाती देशांमध्ये त्यांनी पराक्रम बजावला, तर दुसऱ्या महायुद्धात आसाम रायफल्स प्रामुख्याने बर्मा म्हणजे सध्याच्या म्यानमारमध्ये तैनात होती. आसाम रायफल्समध्ये सध्या 46 बटालियन आहेत. तब्बल 63,747 कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स   (बीएसएफ)

1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दलाची स्थापना झाली. प्रामुख्याने सीमांचं रक्षण करण्यासाठी हे दल कार्यरत आहे. बीएसएफच्या तब्बल 186 बटालियन्स आहेत. 2 लाख 57 हजार 363 कर्मचारी बीएसएफमध्ये तैनात आहेत. बीएसएफची स्वतःची एअर विंग, मरीन विंग, आर्टीलरी रेजिमेंट आणि कमांडो युनिटही आहेत. बीएसएफ हे जगातलं सर्वात मोठं सीमा सुरक्षा दल आहे. 1971 चं भारत पाकिस्तान युद्ध, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेले ऑपरेशन ब्लु स्टार, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाशी मुकाबला, कारगिल युद्ध, 2001 साली बांगलादेशशी झालेल्या सीमावर्ती चकमकी, भारत पाकिस्तान सीमेवर सातत्याने सुरू असलेल्या चकमकी या कामगिरी या दलाने यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. वाघा बॉर्डर इथे होणाऱ्या बिटींग द रिट्रीट सोहळ्यामुळे हे दल बहुतेकांना परिचित आहे.

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स  (सीआरपीएफ)

केंद्राचं सर्वात मोठं राखीव पोलीस दल... या दलाचं प्रमुख कार्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे. दहशतवादाशी मुकाबला करण्याचं कामही त्यांना करावं लागतं. ब्रिटीशांनी या दलाची स्थापना 1939 साली केली. त्यावेळी क्राऊन्स रिप्रेझेंटेटीव्ह पोलीस असं त्याचं नाव होतं. स्वातंत्र्यानंतर या दलाला सध्याचं नाव मिळालं. देशात ठिकठिकाणी उसळलेल्या दंगली निवारणासाठी हे दल तैनात केलं जातं. त्याचसोबत सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात या दलाने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. सीआरपीएफने संयुक्त राष्ट्रांच्या काही मोहिमांमध्येही सहभाग घेतलाय. 3 लाख कर्मचारी दलात कार्यरत आहेत. 239 बटालियन या दलाचा भाग आहेत.

सेंट्रल इंडस्ट्रीअल सिक्युरिटी फोर्स  (सीआयएसएफ)

संसदेत कायदा करून 10 मार्च 1969 या दिवशी या दलाची स्थापना झाली. 15 जून 1983 या दिवशी या दलाला निमलष्करी दलाचा दर्जा देण्यात आला. 1 लाख 48 हजार कर्मचारी या दलात कार्यरत आहेत. केंद्री. अस्थापना, दिल्ली मेट्रो आणि देशातल्या विमानतळांची सुरक्षा ही या दलाची जबाबदारी आहे. केंद्रीय औद्योगिक आस्थापना उदाहरणार्थ अणुउर्जा प्रकल्प, अवकाश संशोधन, खाण, तेल शुद्धीकरण, महत्त्वाची बंदरे, अवजड उद्योग, धरणे, खत प्रकल्प, विमानतळ, वीज निर्मिती प्रकल्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफवर आहे. त्याशिवाय काही खासगी उद्योगांनाही त्यांच्या मागणीनुसार सीआयएसएफची सुरक्षा केंद्र सरकार पुरवतं. यात टीस्को, सेबी, बंगळुरू विधानसभा, ओरिसा खाण कंपनी, तेलंगणा विधानसभा, बंगळुरू रस्ते वाहतूक यांचा समावेश होतो.

नॅशनल सिक्युरिटी गार्डस् (एनएसजी)

1984 साली झालेल्या ऑपरेशऩ ब्लू स्टारनंतर या कमांडो पथकाची निर्मिती झाली. दहशतवाद विरोधी कारवायांशी लढा हे या दलाचं मूळ कार्य. गृहखात्याच्या अखत्यारीत याचा समावेश असला तरी सीएपीएफच्या अंतर्गत याचा समावेश होत नाही. ही स्पेशल फोर्स म्हणून विशेष गणली जाते. दहशतवादाशी लढा हे प्रमुख कर्तव्य असल्याने यासाठीचं मनुष्यबळ प्रामुख्याने भारतीय लष्करातर्फे पुरवलं जातं. एनएसजीचे दो भाग पडतात. दहशतवादाशी लढणारं स्पेशल रेंजर्स ग्रुप आणि पोलीस जबाबदारी पार पाडणारे.. पहिल्या गटात आर्मीकडून तर दुसऱ्या प्रकारात सीएपीएफकडून मनुष्यबळ पुरवलं जातं. व्हीआयपी सुरक्षा हे एनएसजीचं आणखी एक महत्त्वाचं कार्य.... काळ्या गणवेशामुळे एनएसजी कमांडोंना ब्लॅक कॅट कमांडोही म्हटलं जातं. अतिशय आणीबाणीच्या काळातच या दलाला पाचारण केलं जातं. दहशतवाद विरोध, अपहरण झालेल्या विमानाची मुक्तता, बॉम्ब निकामी करणं, बॉम्बस्फोटानंतरचा शोध, ओलीस धरलेल्यांची मुक्तता यात हे दल निष्णात आहे.

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस  (आयटीबीपी)

24 ऑक्टोबर 1962 या दिवशी आयटीबीपीची स्थापना झाली. भारत चीन युद्धानंतर या दलाची स्थापना कऱण्यात आली. भारताच्या तिबेटला लागून असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली. 1996 साली कायद्यात सुधारणा करत संसदेने आयटीबीपीला सीमासुरक्षा आणि त्याच्याशी निगडीत इतर कर्तवय बहाल केली. 60 बटालियन असलेल्या या दलात 89 हजार कर्मचारी आहेत. भारतात सीमा सुरक्षासह परदेशातही या दलाने जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या बोस्निया हर्जेगोविना, कोसोवो, सीएरा लोएन, हाईती, पश्चिम सहारा, सुदान, अफगाणिस्तान या देशात या देशाने शांती मोहिमांमध्ये सहभाग घेतलाय.

सशस्त्र सीमा बल  (एसएसबी)

सीमावर्ती भागातल्या नागरिकांची सुरक्षा करणे, शांततेच्या काळात देशकार्यासाठी त्यांना प्रेरीत करणे हे त्यांचे कार्य आहे. तस्करी रोखणे आणि घुसखोरांचा प्रतिबंध ही कर्तव्येही ते पार पाडतात.