...आता पुरेपुर झोप घेण्यासाठी मिळणार पैसे

झोपेच्या बदल्यात मिळणार पैसे...

Updated: Dec 5, 2019, 06:15 PM IST
...आता पुरेपुर झोप घेण्यासाठी मिळणार पैसे title=
फोटो सौजन्य : wakefit

बेंगळुरु : काही लोकांना झोप अतिशय प्रिय असते. सतत झोप येणारे ऑफिसच्या वेळेतही अनेकदा काही वेळासाठी का होईना झोपत असल्याचं दिसतं. अति झोपेमुळे त्यांना ऑफिसमध्ये वरिष्ठांचा ओरडाही खावा लागतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हीच झोपेची सवय आता तुम्हाला पैसे मिळूवन देऊ शकते. शेकडो, हजारो नाही तर, झोपण्यासाठी तब्बल १ लाख रुपये मिळणार आहे. देशातील आयटी हब आणि बेंगळुरुतील एक कंपनी झोपेच्या बदल्यात तुम्हाला १ लाख रुपये देण्यासाठी तयार आहे.

अति झोपणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. झोपेच्या बदली ओरडा नाही तर चक्क पैसे मिळणार आहेत. पण यासाठी कंपनीने काही अटीही ठेवल्या आहेत. 

काम - केवळ झोप

भारतीय ऑनलाइन स्लिप सोल्युशन कंपनी 'वेकफिट'ने (Wakefit.co) 'स्लिप इंटर्नशिप' नावाने एक ऑफर सुरु केली आहे. यात निवडल्या गेलेल्या उमेदवाराला एसी आणि सोफा देण्यात येणार आहे. त्यावर केवळ झोपण्याचं काम करायचं आहे. झोपेशिवाय कंपनी दुसरं कोणतंही काम करुन घेणार नाही. पण त्याआधी निवड फेरी (selection round) पूर्ण करावी लागेल. 

काय आहेत अटी? 

निवड फेरीत निवड झालेल्या उमेदवाराला १०० दिवसांपर्यंत, प्रत्येक रात्री ९ तासांची झोप पूर्ण करावी लागेल. अटीनुसार, निवड झालेल्या उमेदवाराला कंपनीकडून देण्यात आलेल्या गोदीवर झोपायचंय आणि झोप कशी झाली? याबाबत सांगायचं. कंपनी झोप घेणाऱ्या व्यक्तीचं समुपदेशन करणार आहे. सोबतच उमेदवाराच्या गादीवर झोपण्याच्या पद्धतीलाही ट्रॅक करणार आहे. यासाठी पायजमा हा ड्रेस कोड असणार आहे.

यादरम्यान, विशेषज्ञांकडून झोपण्यासाठी सल्लाही देण्यात येणार आहे. उमेदवारांची झोप व्हिडिओद्वारे रेकॉर्डही करण्यात येणार आहे. 

याशिवाय, कंपनीकडून स्लिप ट्रॅकरचा वापर करण्यात येणार आहे. या इंटर्नशिपदरम्यान गादीवर झोपण्याआधी आणि झोपल्यानंतर झोपेचा पॅर्टनही रेकॉर्ड करण्यात येणार आहे. 

कंपनीकडून देण्यात आलेल्या अटींप्रमाणे, झोपेचे १०० दिवस योग्यरित्या पूर्ण करणाऱ्याला स्लिप ट्रॅकर आणि १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. 


फोटो सौजन्य : wakefit

https://www.wakefit.co/sleepintern/ कंपनीच्या या वेबसाइटवरुन यासाठी अप्लाय करता येणार आहे.

Wakefit कंपनीचे संचालक आणि सह-संस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी सांगितलं की, लोकांना चांगली झोप घेण्यासाठी प्रेरित करणं, प्रेरणा देणं हा 'स्पिप सोल्युशन कंपनी' म्हणून आमचा उद्देश आहे. प्रत्येक जण वेगवान आयुष्य जगत असताना, पुरेशी झेप घेणं अनेकांना कठिण झालं आहे. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या आरोग्यावर, जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. देशातील ज्यांना झोप अतिशय प्रिय आहे किंवा जे झोपेला सर्वाधिक प्रधान्य देतात अशा व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.