नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ)च्या केंद्रीय बोर्डाची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. यात सध्याच्या आर्थिक वर्षात पीएफवर मिळत असलेल्या व्याज दरावर निर्णय होणार आहे.
सूत्रांनुसार, व्याज दर कमी करण्याची शिफारस केली जाऊ शकते. असे झाल्यास छोट्या बचतींवर पुन्हा एकदा कात्री फिरवली जाऊ शकते. गेल्यावर्षी डिसेंबर २०१६-१७ वर्षासाठी व्याजदर कमी करून ८.६५ टक्के केला होता. एका रिपोर्टनुसार, तुमच्या पीफवर मिळत असलेल्या व्याजाचे दर चालू वर्षासाठीही घटवले जाऊ शकतात. सध्या प्रत्येक खातेदाराच्या वेतनातून १२ टक्के पीएफ कापला जातो. अशात जाणून घेणे गरजेचे आहे की, पीएफचे फायदे काय आहेत? का हे खाते सुरू ठेवले पाहिजे?
पीएफवर मिळणारे ५ फायदे....
तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल पण तुमच्या खात्यावर बाय डिफॉल्ट विमा मिळतो. EDLI (एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इंन्श्युरन्स) योजने अंतर्गत तुमच्या पीएफ खात्यावर ६ लाख रूपयांचा इन्श्युरन्स मिळतो. या योजनेमुळे खातेधारकांना एकगठ्ठा रक्कम मिळते. याचा फायदा कोणताही आजार किंवा अपघात किंवा मृत्यूसाठी घेतला जाऊ शकतो.
१० वर्षांपर्यंत लागोपाठ पीएफ खात्यात पैसे जमा होत राहिल्यास तुम्हाला तुमच्या खात्यावर एम्प्लॉई पेन्श स्किमचा फायदा मिळतो. जर एखादा खातेदार लागोपाठ १० वर्ष नोकरीवर राहतो आणि त्याच्या खात्यात सतत पैसे जमा होत राहतात, त्यांना पेन्शन स्किमनुसार निवॄत्तीनंतर एक हजार रूपये पेन्शन रूपाने मिळत राहतील.
ईपीएफओने गेल्या वर्षी बंद पडलेल्या खात्यांवरही व्याज देण्याचा निर्णय घेतला होता. आधी तसे होत नव्हते. आता ३ वर्षांपासून बंद पडलेल्या खात्यांवर व्याज मिळणार आहे.
नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे ट्रान्सवर करणे आता सोपे झाले आहे. आधारसोबत लिंक केल्यावर यूनिक नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एकापेक्षा अधिक पीएफ खात्यांना एकत्र ठेवू शकता. नवीन नोकरी जॉईन करताना ईपीएफचे पैसे क्लेम करण्यासाठी फॉर्म-१३ भरण्याची गरज भासणार नाही. ईपीएफओने नुकताच एक फॉर्म-११ जारी केलाय, ज्याने तुमचं जूनं खातं आपोआप नव्या खात्यात ट्रान्सवर होणार.
अनेकदा लोक नोकरी बदलताना पीएफ खात्यातून पैसे काढतात. ते असे करतात कारण त्यांना वाटतं की, ते चालू खात्यातून पैसे काढू शकत नाहीत. असे नाहीये, तुम्ही काही कारणांसाठी पैसे काढू शकता. पण यात अट आहे की, तुम्ही पूर्ण रक्कम काढू शकत नाहीत. घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी, घराचं लोन रिपेमेंट करण्यासाठी, आजारापणात, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे काढू शकता. पण या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना एक निश्चित वेळेसाठी ईपीएफओचा सदस्य असणं गरजेचं आहे.