नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली. यात भारताचे जवळपास २० सैनिक शहीद झालेत. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैनिक शहीद होत असताना मोदी शांत का, असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली, असा थेट सवाल राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.
Why is the PM silent?
Why is he hiding?Enough is enough. We need to know what has happened.
How dare China kill our soldiers?
How dare they take our land?— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2020
गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. तसे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिले आहे. लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झाले आहे. लडाख येथे नेमके काय घडले आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. चीनने आपला भूभाग घेण्याची हिंमत कशी केली, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.