फरफटतं नेलं...बेदम मारलं...झाडावर टांगलं; 2 मुलींविषयी सांगताना आईचा टाहो

दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Sep 15, 2022, 09:01 AM IST
फरफटतं नेलं...बेदम मारलं...झाडावर टांगलं; 2 मुलींविषयी सांगताना आईचा टाहो title=

लखीमपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली आहे. हे प्रकरण निघासन कोतवालीमधील आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आयजी लखनऊ रेंज लक्ष्मी सिंह यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. 

दोन्ही मुलींचं शवविच्छेदन डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई केली जाईल. या प्रकरणात हत्येची बाब समोर आल्यास गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही, असंही प्रशांत कुमार यांनी सांगितलंय.

एका वेबसाईटला फोनवरून माहिती देताना लखीमपूरचे डीएम महेंद्र बहादूर सिंह म्हणाले की, दोन्ही मुलींच्या शवविच्छेदनानंतर हत्येचं कारण समजेल. दोन्ही मुलींचे शवविच्छेदन गुरुवारी म्हणजेच आज केलं जाणार आहे.

मुलींना जबरदस्तीने घेऊन गेले

या घटनेबाबत मृत मुलींच्या आईने दिलेले वक्तव्य ऐकून तुमचीही पायाखालची जमीन सरकेल. दोन्ही मृत बहिणींच्या आईने सांगितले की, "ती बुधवारी दुपारी तिच्या 15 आणि 17 वर्षांच्या दोन मुलींसह घराबाहेर बसली होती. काही वेळाने मुलींना बाहेर सोडून ती कामासाठी घरात गेली आणि त्याचवेळी बाईकवरून तीन तरुण तिथे पोहोचले."

त्यांच्या आईने पुढे सांगितलें की, "तीन पैकी दोन मुलांनी त्यांच्या मुलींना फरफटत नेलं आणि एका मुलाने बाईक सुरू केली आणि दोघांसह घटनास्थळावरून पळ काढला. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिघेही लालपूरचे रहिवासी होते.

विरोधकांनी निशाणा साधला

या घटनेवरून विरोधकांनी यूपी सरकारवर निशाणा साधलाय. सपा अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट केलंय की, "निघासन पोलिस स्टेशन परिसरात 2 दलित बहिणींचं अपहरण आणि त्यांच्या वडिलांचा पोलिसांवरचा आरोप अत्यंत गंभीर आहे की, पंचनामा आणि संमतीशिवाय शवविच्छेदन करण्यात आलं. लखीमपूरमधील शेतकऱ्यांनंतर आता दलितांची हत्या ही 'हाथरस की बेटी' हत्याकांडाची भयंकर पुनरावृत्ती आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही याबाबत ट्विट केलंय, "लखीमपूरमध्ये दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. कुटुंबीयांचे म्हणणं आहे की, त्या मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आलं होतं. यूपीमध्ये महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? सरकारला कधी जाग येणार?"