Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून शड्डू ठोकले जात आहेत. काल भाजपने 195 जागेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता इंडिया आघाडीने देखील कंबर कसली आहे. आज बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये मोठी गर्दी पहायला मिळाली. या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. लालू यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका केली तर नितिश कुमार यांना चांगलेच टोले लगावले. मात्र, लालू यादव यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
पाटणामध्ये झालेल्या रॅलीमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांचे अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मोदी परिवारवादावर बोलतात, मला सांगा मोदीजी तुम्हाला मूल का झालं नाही? तुम्हाला कुटुंब नाही. मोदी तुम्ही हिंदूही नाही, असं म्हणत लालू यादव यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले लालू यादव?
मी तुम्हाला सांगतोय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत. तसंच त्यांच्याकडे कुटुंबही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं निधन झालं. तरीही त्यांनी क्षौर केलं नाही. हिंदू धर्मात जेव्हा आई किंवा वडिलांचं निधन होतं, तेव्हा दाढी मिशा काढून क्षौर केलं जातं, मात्र, पंतप्रधान मोदींनी असं काहीही केलं नाही, त्यामुळे हिंदू नाहीत, असा खळबळजनक दावा लालू यादव यांनी केलाय. नरेंद्र मोदी फक्त तिरस्कार पसरवण्याचं काम करतात, हा राम रहिमचा देश आहे, असंही लालू यावेळी म्हणाले आहेत.
आमची चूक झाली...
या रॅलीमध्ये लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर देखील हल्लाबोल केला. नितीशकुमार पहिल्यांदा एनडीएबरोबर गेले तेव्हा आम्ही त्यांना काहीही बोललो नाही, 2017 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीमध्ये गेले तेव्हा देखील आम्ही काही बोललो नाही. आम्हाला माहितीये की ते पटलूराम आहेत, असंही लालू म्हणतात. त्यांना आम्ही महाआघाडीमध्ये घेतलं, ही आमची चूक झाली.
"Modi is not a Hindu. Every Hindu shaves his head after the death of his mother but Modi did not. Why didn't he shave? Tell me!"
— Lalu Yadav destroys Modi in 100 secs pic.twitter.com/ATFzlAPSw8
— Rohini Anand (@mrs_roh08) March 3, 2024
महाराष्ट्र, बिहार, बंगाल या तीन राज्यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे, त्यामुळे तीनही राज्यात पक्ष, नेत्यांची तोडफोड झाली. पण त्यानंतरही तेजस्वी यादव यांनी आज पटन्याच्या गांधी मैदानावर घेतलेल्या जनविश्वास रॅलीतील तुडुंब गर्दी पहायला मिळाली. तेजस्वी यादव यांनी विधानसभा निवडणुकीतही असाच माहौल केला होता. आता लोकसभा निवडणुकीत ही गर्दी मतात रुपांतरीत होणार का? असा सवाल मात्र विचारला जातोय.