Pan-Aadhar Link: पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, अन्यथा पैसे असूनही व्यवहार करणं होईल कठीण

Pan-Aadhar Link: जर तुम्ही अद्याप आपलं पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करा. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना 31 मेपर्यंत पॅन-आधार लिंक करण्यास सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2024, 02:46 PM IST
Pan-Aadhar Link: पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची संधी, अन्यथा पैसे असूनही व्यवहार करणं होईल कठीण title=

Pan-Aadhar Link: मागील जवळपास एका वर्षापासून सरकार वारंवार एक गोष्ट सांगत आहे की, आपलं पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्या. सरकारकडून यासाठी अनेकदा अंतिम मुदतही देण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतं शुल्कही आकारण्यात आलं नव्हतं. पण आता मात्र यासाठी 1 हजारांची फी भरावी लागणार आहे. जर तुम्हीही अद्याप आपलं पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करा. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना 31 मेपर्यंत पॅन-आधार लिंक करण्यास सांगितलं आहे. जर 31 मेपर्यंत लिंक केलं नाही तर संबंधित करदात्यांकडून अतिरिक्त टीडीएस घेतला जाईल. 

दुप्पट नुकसान होणार

सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, 31 मेनंतर ज्यांचे पॅन आधार कार्डशी लिंक नसतील त्यांच्याकडून दुप्पट टीडीएस आकारला जाईल. म्हणजेच जर एखाद्याचा टीडीएस 50 हजार रुपये कापला जात असेल. तर तो 1 लाख होईल. तसंच संबंधित करदात्यांचं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होईल. जे करदाते आधार आणि पॅन लिंक करतील त्यांना मात्र कोणतंही नुकसान होणार नाही. 

10 हजारांपर्यंत दंड

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अशा करदात्यांना म्युच्युअल फंड किंवा स्टॉक खातं सुरु कऱण्यासारख्या सुविधा मिळणार नाहीत. तसंच जर तुम्ही पॅन कार्डचा वापर एखाद्या ठिकाणी कागदपत्र म्हणून वापर केला तर मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 272B नुसार तुम्हाला 10 हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. 

आधार-पॅन लिंक अनिवार्य का?

देशभरात पॅन कार्डशी संबंधित अनेक फसवणुकीची प्रकरणं समोर आली आहेत. तसंच कर वाचवण्यासाठी अनेक क्ल्पुत्या वापरल्या जातात. हेच रोखण्यासाठी सरकारच्या वतीने पॅन आणि आधार लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 

प्राप्तिकर विभागाने बँका, फॉरेक्स डीलर्स आणि इतर संस्थांनाही 31 मेपर्यंत आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यास सांगितलं आहे. असं न केल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो. एसएफटी उशिरा भरल्यास दिवसाला 1 हजार रुपये अशा हिशोबाने दंड ठोठावला जाणार आहे. 

पॅन-आधार कार्ड लिंक कसं करायचं?

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आयकर वेबसाइट www.incometax.gov.in वर जावं लागेल. येथे आधार लिंकचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक, जन्मतारीख यासारखी माहिती टाकावी लागेल. यानंतर, पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून, तुमचे आधार आणि पॅन लिंक केले जाईल.

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होणार?

- 5 लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी करु शकत नाही. 
- कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करताना अडचण होईल. 
- बॅकांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त पैसे जमा करता आणि काढता येणार नाही. 
- म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवू शकणार नाही. 
- पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास टॅक्स रिटर्न फाईल करु शकणार नाही. 
- शासकीय योजनांचा फायदा घेताना अडचण होईल.