नवी दिल्ली : कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 सुरु करण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान अटी-शर्तींसह वाईन शॉप सुरु करण्यास सूट देण्यात आली आहे. सोमवारी जवळपास एक महिन्यानंतर वाईन शॉप सुरु झाल्याने मद्यपींनी दुकानं सुरु होण्याआधीच दारुच्या दुकानांबाहेर मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करण्यात येत नसल्याचं चित्र होतं. या दरम्यान आता दिल्लीत दारु महाग झाली आहे. दारुच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारने दारु विक्रीवर स्पेशल कोरोना फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरपीवर 70 टक्के फी आकरण्यात येणार आहे. वाढणारे दर मंगळवार सकाळपासून लागू करण्यात येणार आहेत. उत्पादन शुल्क आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून, पोलिसांना दारुच्या दुकानांवर कायदा, सुव्यवस्था निर्माण करण्यास मदत करण्याबाबत सांगितलं आहे. दिल्लीत सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 पर्यंत दारुची दुकानं सुरु राहणार आहेत. मात्र, एका रिपोर्टनुसार, वाईन शॉप बाहेरील गर्दी टाळण्यासाठी दारु विक्रीची वेळ वाढवली जाऊ शकते. त्याशिवाय लोक गरजपेक्षा अधिक दारुची खरेदी करत करु शकतात त्यामुळे दुकानांमध्ये पुरेसा साठा असण्याबाबतही सांगण्यात आलं आहे.
#WATCH Delhi: Long queue outside a liquor shop in Chander Nagar area. Delhi Government has imposed a "Special Corona Fee" of 70% tax on Maximum Retail Price (MRP) of the liquor. pic.twitter.com/rMSDdOdvZR
— ANI (@ANI) May 5, 2020
राजधानी दिल्लीत 40हून अधिक दिवसांनंतर दारुची दुकानं, वाईन शॉप सुरु करण्यात आली. परंतु दुकानांबाहेरील लांबच लांब रांगा, सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न करणे यामुळे अनेक वाईन शॉप बंददेखील करावी लागली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, वाईन शॉप बाहेर सोशल डिस्टंन्सिंगचं पालन न झाल्यास दुकान सील केलं जाण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार देशात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन जाहीर करण्यात आले आहेत. संपूर्ण दिल्ली रेड झोनमध्ये आहे. रेड झोनमध्ये असलेल्या दिल्लीत केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.