नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाल संबोधित करत 'लॉकडाऊन ४' चे संकेत दिले. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर लेखिका शोभा डे यांनी ट्वीट करत टीका केली आहे. हे पॅकेज सुरुवातीच्या दोन मिनिटांत देखील घोषित करता आले नसते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शोभा डे यांच्या ट्वीटची सोशल मीडियात चर्चा आहे.
Okay. Finally - the package! Couldn't it have been announced in the first 2 minutes????
— Shobhaa De (@DeShobhaa) May 12, 2020
'ठिक आहे...अखेर हे पॅकेज...सुरुवातीच्या दोन मिनिटांत ही घोषणा करु शकत नव्हते का ?' असे ट्विट पंतप्रधानांच्या भाषणानंतर शोभा डे यांनी केले.
I cannot bear this any longer. I have switched off. This is the limit!!!
— Shobhaa De (@DeShobhaa) May 12, 2020
याआधी देखील त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर ट्वीट केलंय. 'मी अजून सहन करु शकत नाही. मी माझा टीव्ही बंद केलाय. याची काहीतरी हद्द असते.' असे ट्विट त्यांनी केले होते.
पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मग जर काही ठोस सांगायचेच नसेल तर लाईव्ह येऊन देशवासियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण का करायचे ? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने भारतीयांनी विचार करायला सुरुवात करावी, या मुद्द्यावर विशेष भर दिला. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यवस्थेतील कच्चे दुवे उघडे पडले आहेत. या काळात आपल्याला स्थानिक स्रोतच अधिक कामाला आले, याकडे मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन केले जायचे. मात्र, सध्या भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे उत्पादन होते. भारताने संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.