नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या देशभरात प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या प्रेमळ स्वभावाने ते नागरिकांची मने जिंकून घेत आहेत. आपल्याला राहुल नावानेच हाक मारा असे ते तरुणांना सांगतात. ज्येष्ठ नागरिक राहुल यांची गळाभेट घेत असतानाचे फोटो देखील सोशल मीडियात चर्चेचा विषय बनतात. राहुल यांच्या स्वभावाचा असाच एक प्रसंग नुकताच पाहायला मिळाला. संगमनेर दौऱ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या समजूतदार प्रवृत्तीचे दर्शन नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखवले.
वैमानिकांच्या बॅगा तपासण्याच्या कारणावरून वैमानिक आणि विशेष सुरक्षा पथकाचे अधिकारी यांच्यात विमानतळावर मानपमान नाट्य रंगले होते. विशेष सुरक्षा पथकाचे अधिकारी माफी मागत नाहीत तोपर्यंत विमानाचे उड्डाण होणार नाही असा पवित्रा वैमानिकांनी घेतला होता. अखेर राहुल गांधी यांनी वैमानिकांची समजूत काढल्यानंतर हे विमान अमेठीकडे झेपावले.
दरम्यान राहुल गांधी यांनी उड्डाण होण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागणार असल्याने तिथेही एचएएलच्या अग्निशमन दलाशी संवाद साधला. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केलं. त्यांच्याशी संवाद साधून अग्निशामक दलाच्या अद्ययावत वाहनांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत छायाचित्रही काढली.