उत्तर प्रदेश : भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी याधीच त्यांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी घालण्यात आली होती. पण ही बंदी न जुमानल्याने साध्वी प्रज्ञा यांना पुन्हा नोटीस जारी केली आहे. काँग्रेसने याप्रकरणी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा यांच्या प्रचारावर 3 दिवसांची बंदी घालण्यात आली होती जी रविवारी सकाळी संपली.
मंदीरात गेल्यामुळे मला नोटीस मिळाली पण मी तर सन्यांसी आहे. मंदीर, पूजापाठ, अध्यात्म, जन कल्याण आणि राष्ट्र कल्याण, गंगा, गोमाता हा माझ्या जीवनाचा आधार आहेत. आम्हाला जर यापासून कोणी रोखतो त्याने आपल्या आयुष्याबद्दल विचार करावा असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले. आम्हाला प्रज्ञा ठाकूर यांचे उत्तर मिळाले असून मुख्य निर्वाचन अधिकारी वी.एल. कांताराव यांच्यापर्यंत पोहोचवून पुढे विचार केला जाईल असे जिल्हा निर्वाचन अधिकारी सुदाम खाडे यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना आतापर्यंत 3 नोटीस बजावल्या आहेत. काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रज्ञा यांना शुक्रवारी तिसरी नोटीस पाठवण्यात आली. साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक विधान केले होते. करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती. निवडणूक आयोगाने यावर तात्काळ प्रज्ञा यांना नोटीस पाठवण्यात आली.
यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य केले. मी बाबरी मशीदीच्या वर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती असे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केले होते. निवडणूक आयोगाने तात्काळ आक्षेप घेत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली. मध्य प्रदेशचे मुख्य निर्वाचन अधिकारी वी एल कांता राव यांनी ही कारवाई केली होती.
आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती.