close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा निवडणूक २०१९ : चौथ्या टप्प्यात हा आहे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई उत्तर मध्यतून काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त ९६ करोड रुपयांच्या एकूण संपत्तीसोबत आठव्या स्थानावर

Updated: Apr 26, 2019, 12:55 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : चौथ्या टप्प्यात हा आहे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

भोपाळ : लोकसभा निवडणूक २०१९ साठी तीन टप्प्यांतील मतदान पार पडलंय. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहे ते म्हणजे नकुलनाथ... नकुलनाथ यांच्याकडे तब्बल ६६० कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलंय. नकुलनाथ हे मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आहेत. ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कमलनाथ यांचादेखील छिंदवाडा हा विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र पित्यापेक्षा पुत्राकडे म्हणजेच नकुलनाथ यांच्याकडे पाच पट अधिक संपत्ती आहे.

प्रिया दत्त - ९६ करोड रुपयांची संपत्ती

दुसरीकडे, महाराष्ट्रात मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारी प्रिया सुनील दत्त यांनी आयकर परताव्यात १३ करोड रुपयांची संपत्ती दाखवली आहे. परंतु, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार, चौथ्या चरणात १० श्रीमंत उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्यतून काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त ९६ करोड रुपयांच्या एकूण संपत्तीसोबत आठव्या स्थानावर आहेत. 

सर्वात गरीब उमेदवार

चौथ्या चरणात तीन असेही उमेदवार आहेत ज्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही. राजस्थानच्या झालावाड बारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रिन्स कुमार यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती नाही. त्यांच्याकडे केवळ ५०० रुपये आहेत.

३४५ अपक्ष उमेदवारांचा समावेश

मतदानाच्या चौथ्या टप्प्यात ९ राज्यांतील ७१ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात ९४३ उमेदवार मैदानात आहेत. यात ३४५ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. यातील २१० उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरणं दाखल आहेत. १५८ उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ३०६ उमेदवार करोडपती आहेत.

३७ मतदारसंघांत रेड अलर्ट

ज्या मतदारसंघात तीन पेक्षा जास्त उमेदवारांनी आपल्यावरचे गुन्हेगारी प्रकरणांची घोषणा केली असेल त्या मतदारसंघांत 'रेड अलर्ट' घोषित करण्यात येतो. त्यानुसार, चौथ्या टप्प्यातील ७१ मतदारसंघांपैंकी ३७ मतदारसंघांत रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय.