close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालवर भाजपाचे लक्ष्य, आज पंतप्रधानांच्या दोन सभा

उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालवर भाजपाच्या नेतृत्वाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. 

Updated: May 16, 2019, 11:24 AM IST
उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालवर भाजपाचे लक्ष्य, आज पंतप्रधानांच्या दोन सभा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालवर भाजपाच्या नेतृत्वाने लक्ष्य केंद्रीत केले आहे. या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या आज दोन प्रचार सभा होणार आहेत. डमडम आणि मथुरापूर इथे सभा होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये यावेळी मोदींच्या तब्बल १७ सभा झाल्या. पंतप्रधानांनी यावर्षी उत्तर प्रदेशात तब्बल ३१ सभा संबोधित केल्या. त्याखालोखाल पश्चिम बंगाल हे दुसरे राज्य आहे.  

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आजच इथला प्रचार संपणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आज तृणमूल, भाजपाचा सभांचा धडाका आहे. ममता बॅनर्जींच्या आज चार सभा होत आहेत. मथुरापर, डायमंड हार्बर, जोका आणि सुकंता सेतू इथे त्यांच्या सभा होत आहेत. डायमंड हार्बर याठिकाणी ममता बॅनर्जींचा भाचा रिंगणात आहे. याच ठिकाणी काल पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. आता मतदार नेमकं कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे येत्या २३ मे रोजी समजणार आहे.  

विशेष म्हणजे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशच्या ८० खासदारांनंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. महाराष्ट्र तब्बल ४८ खासदार लोकसभेत पाठवतो. मात्र महाराष्ट्रात पंतप्रधानांनी केवळ ९ प्रचारसभा घेतल्या. पश्चिम बंगालमधून ४२ खासदार निवडून जातात. तिथे सर्वाधिक जागा मिळवण्याचा भाजपाचा मानस आहे. दक्षिणेतल्या तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून तब्बल १०१ खासदार निवडले जातात. मात्र या चार राज्यात मोदींनी केवळ ९ सभा घेतल्या. या वर्षी २७ राज्यात मोदींनी तब्बल १४४ सभा घेतल्या.

शेवटचा दिवस 

निवडणुकीच्या आचार संहिते बाबत निर्वाचन आयोग सक्रिय असलेले पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांच्या रोड शोत झालेल्या हिंसाचारानंतर अंतिम टप्प्यातील मतदानाआधी प्रचार सभेवर बंदी घालण्यात आली. शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सहित 8 राज्यांमध्ये 17 मे संध्याकाळ पर्यंत प्रचार होणार होता. पण मंगळवारी कोलकातामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने 16 मेच्या रात्री 10 नंतर निवडणूक प्रचारास बंदी घातली आहे. 16 मेला बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या दोन प्रचार सभांना मंजूरी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे.