त्रिशंकू स्थितीत हे ३ नेते ठरतील किंगमेकर

लोकसभा निवडणुकीत त्रिशंकु परिस्थितीत या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शैलेश मुसळे | Updated: May 11, 2019, 01:43 PM IST
त्रिशंकू स्थितीत हे ३ नेते ठरतील किंगमेकर title=

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि भाजपमधील काही नेत्यांना देखील असं वाटतं आहे की देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. भाजपला बहुमत मिळणार नाही असं अनेकांना वाटतं आहे. पण जर असं झालं तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल. ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील ३ नेते किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत जाणार हे जवळपास सगळ्याच पक्षांनी स्पष्ट केलं आहे. पण काही पक्षांनी यूपीए आणि एनडीएमध्ये न जाता स्वबळावर निवडणूक लढवली. पण त्रिशंकू परिस्थितीत हेच पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील. ज्यामध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे प्रमुख केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर हे ३ नेते कोणाला पाठिंबा देतात याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 

ओडिशामध्ये २१, आंध्र प्रदेशमध्ये २५ आणि तेलंगणामध्ये १७ जागा आहेत. तिनही राज्यात एकूण ६३ जागा आहेत. ओडिशामध्ये बीजेडी, आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणामध्ये टीआरएस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तिनही राज्यात या पक्षाला चांगलं यश मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेत हे तिनही नेते असणार आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत बीजेडीला २०, वायएसआर काँग्रेसला ९ तर टीआरएसला ११ जागा मिळाल्या होत्या. ६३ पैकी ४० जागा या पक्षांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे या तिनही राज्य भारताचा पंतप्रधान ठरवू शकतात.

१. जगन मोहन रेड्डी

आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसमध्ये टक्कर आहे. काँग्रेस आणि भाजप देखील निवडणूक लढवत आहेत. पण येथे मुख्य लढत ही टीडीपी आणि वायआरएस काँग्रेलमध्येच आहे. राज्यातील २५ लोकसभा आणि १७५ विधानसभेच्या जागांसाठी ११ एप्रिलला मतदान झालं होतं.

एनडीएमधून वेगळे झाल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांनी मोदींच्या विरोधात सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. नायडू यांची काँग्रेस सोबतची जवळीक वाढली आहे. पण जगन मोहन रेड्डी हे काँग्रेसचे विरोधक आहे. नायडू हे काँग्रेस सोबत असल्याने रेड्डी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता कमीच आहे. पण रेड्डी यांनी आधीच जाहीर केलं आहे की जे आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देतील ते त्यांच्याच सोबत जातील.

२. नवीन पटनायक

ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा बीजेडी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. येथे भाजपने देखील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. बीजेडीने आतापर्यंत कधीच काँग्रेसचं समर्थन केलेलं नाही. पण भाजपसोबत बीजेडीने निवडणूक लढवली आहे. २००९ नंतर बीजेडीने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. बीजेडीने भाजप आणि काँग्रेस दोघांपासून अंतर ठेवलं आहे.

२०१४ मध्ये ओडिशामध्ये बीजेडीने २१ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. मोदी सरकार अनेकदा नवीन पटनायक यांच्या बाजुने उभी राहताना दिसली आहे. पण यंदा ओडिशामध्ये भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे नवीन पटनायक यांच्या पक्षाला किती जागा मिळतात आणि ते कोणाला पाठिंबा देतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

३. के चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष देखील स्वबळावर आहे. तेलंगणामध्ये त्यांची लढत ही थेट काँग्रेससोबत आहे. भाजप आणि काँग्रेसला सोडून तिसरी आघाडी तयार करण्यासाठी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री आणि माकपाचे नेते पिनरई विजयन यांची भेट घेतली.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर असं चित्र आहे की, तेलंगणामध्ये टीआरएस यांनाच जास्त जागा मिळतील. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर के चंद्रशेखर राव महत्त्वाची भूमिका बजावतील.