मुंबई : आगमी लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. सर्वच पक्ष आपले उमेदवार आजमवण्यास सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे. अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या गडाला कोणताही धक्का लागला नाही आहे. त्यामुळे उदयन राजे यांची उमेदवारी निश्चित आहे. तसेच कोल्हापूरातून धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. माढा येथील मतदारांचा कल पाहता विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
गोंदिया - भंडाऱ्यातून मधुकर कुकडे, बारामतीतून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचे नाव निश्चित असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
ठाकरे घराण्यापाठोपाठ आता पवार कुटुंबीयांची जनरेशन नेक्स्ट राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मावळमधून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची फार आधीपासून चर्चा होती. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पार्थ अजित पवार यांचे नाव देखील समोर येऊ शकते. मात्र, अजित पवार किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने याविषयी अधिकृतरित्या भाष्य केलेले नाही.
अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.