पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 12, 2024, 01:17 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा...' title=

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) उधमपूर येथे रॅलीला संबोधित करताना दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल आणि येथे लवकरच विधानसभा निवडणुका होतील अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली आहे. नॅशनन कॉन्फरन्स आणि पीडीपीसहित अनेक राजकीय पक्ष जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली ही घोषणा फार महत्त्वाची आहे. 

नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. "काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते. हे लोक श्रावणात एका आरोपीच्या घरी जाऊन मटण शिजवत आहेत. इतकंच नाही तर त्याचा व्हिडीओ काढून देशातील लोकांना चिडवलं जात आहे. कायदा कोणालाही काही खाण्यापासून रोखू शकत नाही. आपण मांसाहार करावा की शाकाहार याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण यांचा हेतू वेगळाच असतो. हे लोक श्रावणात व्हिडीओ दाखवून आपल्या मुघल मानसिकतेने लोकांना चिडवत आपला व्होटबँक वाचवत आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

"नवरात्रीच्या दिवसात मांसाहर करतानाचे व्हिडीओ दाखवून, लोकांच्या भावना दुखावून विरोधक नेमके कोणाला आनंदी करण्याचा खेळ खेळत आहेत. आता मी हे बोलल्यानंतर ते माझ्यावर शिव्यांचा वर्षाव करतील. पण जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाते, तेव्हा लोकशाहीत माझं दायित्व आहे की, मी सर्व गोष्टी योग्य पद्दतीने सांगाव्यात. हे लोक मुद्दामून असं करुन देशाच्या मान्यतांवर हल्ला करत आहेत. एक मोठा वर्ग हे व्हिडीओ पाहून अस्वस्थ होतो," अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, "2014 मध्ये मी माता वैष्णोदेवी मंदिरात डोकं टेकलं होतं. उधमपूरमध्ये याच ठिकाणावरुन मी सभेला संबोधित केलं होतं. तेव्हा मी तुम्हाला जम्मू काश्मीरच्या लोकांच्या सर्व समस्या दूर करेन अशी हमी दिली होती. मी माझं आश्वासन पूर्ण केलं आहे. ही पहिलीच निवडणूक आहे, जेव्हा दहशतवादी, दगडफेक, हल्ले निवडणुकीचे मुद्दे नाहीत. हा निवडणूक फक्त खासदार निवडण्यासाठी नाही तर केंद्रात एक मजबूत सरकार आणण्यासाठी आहे".

जम्मू काश्मीरच्या पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी येथे मतदान होणार आहे.