शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.  

Updated: Nov 20, 2019, 07:13 PM IST
शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. २२ ते २४ नोव्हेंबर या काळात नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल. आत्तापर्यंत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नुकसान भरपाईसाठी प्राथमिक दोन हजार कोटींचा आवश्यक निधी विविध विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र नुकसान जास्त असल्यानं NDRFकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार केंद्राच्या पाहणीनंतर सुमारे ७ हजार २०० कोटींची मागणी करण्यात येणार आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शेतकरी प्रश्नावर मोदींची भेट घेतली. शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या, अशी मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याशीही सल्लामसलत केली. ओल्या दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याचा पवारांनी आग्रह केला आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या ओल्या दुष्काळाची माहिती दिली. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी देण्याची मागणी केली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक महाराष्ट्र  राज्यात पाहणी करण्यासाठी येत आहे.

त्याआधी महाराष्ट्रात कोरडा आणि ओला दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली होती. तसेच राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती. परंतु ही कमी असल्याचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच शिवसेनेचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना तात्काळ जास्त मदत उपलब्ध करुन द्याण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका - शिवसेना

केंद्रातील मोदी सरकारवर शिवसेनेने पुन्हा हल्लाबोल केला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे, 'शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका.' आधीच कर्ज डोक्यावर असतानाच परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. त्यात कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी रोज मृत्यूला कवटाळतो आहे. मागील एका महिन्यात मराठवाड्यात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे हे अस्वस्थ करणारे आहेत. हतबल झालेला शेतकरी केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहे. त्यांना तातडीने मदत करा. आमहत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, त्यांना आधार द्या आणि त्यांचे प्राण वाचवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आधी कोरडा दुष्काळ आणि त्यानंतर ओला दुष्काळाने शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्याचे जगणे असह्य झाले आहे. शेतकऱ्याला मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांने करायचे काय, हा प्रश्न त्याच्यापुढे आहे. काहींचा संयम सुटत चालला आहे. काहींनी मृत्यूला जवळ केले आहे. हे संकट दूर झाले पाहिजे. अन्यथा राज्यात शेतकरी   जगलाच नाही तर पुढील स्थिती अत्यंत भयंकर असेल, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे.