पालकांपासून दूर झालेल्या 3 मुलांना बनवले मुस्लिम, संचालकाच्या नावे काढलं आधार कार्ड

या मुलांच्या नावावर संस्थेच्या संचालकाने आपलं नाव टाकलं आहे

Updated: Nov 13, 2022, 01:44 PM IST
पालकांपासून दूर झालेल्या 3 मुलांना बनवले मुस्लिम, संचालकाच्या नावे काढलं आधार कार्ड title=
NCPCR चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो

देशात आलेल्या कोरोना (Corona) लाटेमुळे गेल्या दोन वर्षांत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. अनेकांनी मुलांनी आपले पालक गमावले आहेत. अशातच अशा मुलांचे संगोपन करण्यासाठी राजकारण्यांसह संस्थाही पुढे आल्या आहेत. तसेच सरकारतर्फेही या मुलांसाठी विशेष व्यवस्ता करण्यात आली आहे. मात्र मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) कोरोनामुळे पालकांपासून वेगळे  झालेल्या तीन मुलांसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. एका तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि सर्वाना धक्का बसला. दरम्यान या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. (madhya pradesh 3 innocent children made Muslims identity in nursery home)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळला (Bhopal) लागून असलेल्या रायसेन जिल्ह्यात बालगृहात राहणाऱ्या तीन मुलांचे कथितरित्या धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बालगृहाच्या संचालकाने कोरोनाच्या काळात नातेवाइकांपासून विभक्त झालेल्या मुलांचा धर्म बदलून त्यांचे आधार कार्ड बनवले. तसेच आधार कार्डवर मुलांच्या पालकांच्या नावाऐवजी स्वतःचे नाव लिहून घेतले. ही बाब उघडकीस आल्यानंतर बालगृह चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय बाल आयोगही या प्रकरणावर सक्रिय झाला आहे. माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी बालगृहाचे सर्व दस्तऐवज जप्त केले आहेत.

नेमकं काय घडलं?

रायसेन जिल्ह्यातील गौहरगंज येथील सरकारी अनुदानित बालगृहात हा सर्व प्रकार घडला आहे.2020 मध्ये कोरोनाच्या काळात भोपाळजवळ एक मुलगा दोन मुलींसह भटकताना आढळून आला होता. ही मुले त्यांच्या पालकांपासून विभक्त झाली होती. त्यामुळे तिघांनाही भोपाळ कल्याण समितीने रायसेन बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. त्यानंतर मुलांचे पालक सापडेपर्यंत त्यांना गौहरगंज येथील गोडी बालगृहात पाठवण्यात आले. माध्यामांच्या वृत्तानुसार, बालगृहाचे संचालक हसीन परवेझने मुलांची नावे बदलून त्यांचे नवीन आधारकार्ड बनवून घेतले. परवेझने मुलांच्या पालकांच्या नावावर स्वत:चे नाव टाकले.

खुलासा कसा झाला?

innocent children made Muslims identity

एका तक्रारीच्या आधारे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR)चे अध्यक्ष प्रियांक कानुंगो हे शिशुगृहाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांना मुलांची ओळख बदलल्याचे आढळून आले. मुलांनीही त्यांना सांगितले की पूर्वी त्यांची नावे वेगळी होती. पण येथे त्यांची ओळख बदलली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे कानूनगो यांनी म्हटले आहे. प्रियांक कानुंगो यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, मध्य प्रदेशातील रायसेन येथील एका बालगृहाच्या तपासणीदरम्यान हे प्रकरण उघडकीस आले.