महागाईसाठी मोदी नाही, तर नेहरू जबाबदार! भाजप नेत्याचा अजब तर्क

देशात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याचं वक्तव्य

Updated: Jul 31, 2021, 09:54 PM IST
महागाईसाठी मोदी नाही, तर नेहरू जबाबदार! भाजप नेत्याचा अजब तर्क

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) भाजप सरकारचे मंत्री विश्वास सारंग (Vishvas Sarang) यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मंत्री विश्वास सारंग यांनी देशातील वाढत्या महागाईला जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले महागाईची समस्या ही एक -दोन दिवसांत निर्माण होत नाही, 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरून जवाहरलाल नेहरूंच्या भाषणाच्या चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डगमगली.

देशात वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री विश्वास सारंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्थेला पंगू करून महागाई वाढवण्याचे श्रेय जर कोणाला जातं, तर ते नेहरू कुटुंब आहे. एक -दोन दिवसांत महागाई वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक -दोन दिवसात घातला जात नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावरून (पहिले पंतप्रधान) जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या भाषणाच्या चुकांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली.

विश्वास सारंग पुढे म्हणाले की, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. भाजप सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी आणि अर्थव्यवस्थेत त्यांच्या सहभागासाठी योजना सुरू केल्या आहेत. तर काँग्रेस राजवटीत अर्थव्यवस्था काही उद्योगपतींच्या हातात होती. भाजपच्या राजवटीत महागाई कमी झाली आणि लोकांचे उत्पन्न वाढलं, असा दावा सारंग यांनी केला आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी 10 जनपथ (काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान) समोर आंदोलन केलं पाहिजे असंही ते म्हणाले

विश्वास सारंग यांच्या वक्तव्याची काँग्रेस नेत्यांनी खिल्ली उडवली आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते के के मिश्रा म्हणाले, 'शिवराज सरकारचे मंत्री विशाल सारंग देशाच्या महागाईसाठी 1947 मध्ये नेहरूंच्या भाषणाला दोष देत आहेत, तेव्हा सारंग जन्मालाही आले नव्हते.' कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या अभावामुळे हजारो लोकांच्या मृत्यूलाही नेहरू जबाबदार होते का? हे विश्वास सारंग सांगू शकतील का असा टोलाही लगावला आहे. 

काँग्रेसचे आणखी एक प्रवक्ते नरेंद्र सलुजा म्हणाले की, मध्य प्रदेशातील भाजपचे मंत्रालय विचित्र लोकांनी भरलेले आहे. 'एक मंत्री दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढतो, एक मंत्री म्हणतो की एका जोडप्याला किती मुले असावीत, एक मंत्री म्हणतो की त्यांना सेल्फी काढण्यासाठी पैशांची गरज आहे आणि आता एका मंत्र्याने 75 वर्षांपूर्वी झालेलं भाषण आताच्या महागाईला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. असं असेल तर मग भाजपाने आपल्या निवडणूक प्रचारात महागाईपासून मुक्तीचे आश्वासन जनतेला का दिलं? असा सवालही काँग्रेसने केला आहे.