प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्री बाघम्बरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर त्यांची 12 पानी सुसाईड नोट समोर आली आहे. ज्यात त्यांनी आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांना त्यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं आहे. यासोबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. मुलीसोबतचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या करायची होती, पण हिंमत झाली नाही असं यात लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना जे पत्र मिळाले ते 13 तारखेलाच लिहिलं गेलं आहे. नंतर तारीख खोडून 20 सप्टेंबर अशी लिहिण्यात आली. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावं 5 वेळा लिहिली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आनंद गिरी, आद्य तिवारी, संदीप तिवारी यांच्यासह अनेक लोकांची नावे आहेत.
1. एकूण 12 पानांची ही सुसाईड नोट आहे. अध्यक्ष श्री मठ बाघम्बरी यांच्या लेटर पॅडवर ही सुसाईड नोट लिहिली आहे.
2. मी खूप दुःखी होऊन आत्महत्या करत आहे, असं यात म्हटलं आहे.
3. माझ्या मृत्यूसाठी आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी हे जबाबदार आहेत.
4. प्रयागराज पोलिसांना विनंती आहे की या तिघांवर कायदेशीर कारवाई करा, जेणेकरून माझ्या आत्म्याला शांती मिळेल
5. महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलंय की ते 13 सप्टेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न करत होते, पण ते धाडस करू शकले नाहीत.
6. आनंद गिरीने संगणकाच्या मदतीने चुकीचं काम करतानाचा आपला फोटो व्हायरल केला. मी विचार केला, कोणा-कोणाला याबाबत उत्तर देऊ, आपली बदनामी होईल, म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. आनंद गिरी, आद्या तिवारी, संदीप तिवारी माझ्या मृत्यूला जबाबदार असतील.
7. आनंद गिरी यांनी असत्य आणि खोटे आरोप केले, तेव्हापासून मी मानसिक दबावाखाली जगत आहे.
8. जेव्हाही मी एकटं असतो, मला मरण्याची इच्छा होते, या तिघांनी माझा विश्वासघात केला, या तिघांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडिया, फेसबुक, वर्तमानपत्रात माझ्या चारित्र्यावर खोटे आरोप केले, मी एकही पैसा घरी दिला नाही, एक-एक पैसा मंदिर आणि मठासाठी खर्च केला. 2004 मध्ये आपण महंत झालो, तेव्हापासून मठ आणि मंदिराच्या विकासाबद्दल सर्व भक्तांना माहिती आहे.
9. आनंद गिरी यांनी जे काही आरोप केले त्यामुळे माझी आणि मठ-मंदिराची बदनामी झाली. यामुळे मी खूप दुखावलो आहे
10. मी नेहमीच समाजात सन्मानाने जगलो आहे, पण आनंद गिरीने चुकीच्या मार्गाने माझी बदनामी केली
11. माझी शेवटची इच्छा आहे की माझ्या समाधीची जागा लिंबाच्या झाडाजवळ गुरुजींच्या सिंहासनाजवळ ठेवावी
12. प्रिय बलवीर, ओम नमो नारायण. मठ-मंदिराची व्यवस्था जशी मी ठेवली त्याचप्रमाणे सुरु ठेवण्याचा प्रयत्न कर
13. परमपूज्य महंत हरी गोविंद पुरीजी यांना विनंती आहे की महंत बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी बनवावे.
14. आशुतोष आणि नितेश सर्वांनी महात्मा बलवीर यांना सहकार्य करावे.
15. महंत रविंद्र तुम्ही नेहमी मला साथ दिली, माझ्यानंतर बलवीर यांनाही सहकार्य करा.
16. माझ्या खोलीची चावी बलवीर यांना सोपवण्यात यावी
17. आदित्य मिश्र आणि शैलेंद्र सिंह रिअल इस्टेटमधून काही पैसे घ्यायचे आहेत
18. सुसाईड नोटवर महंत नरेंद्र गिरी यांची स्वाक्षरी आहे
19. बलवीरजी माझ्या शिष्यांची काळजी घे, मनीष शुक्ला, अभिषेक मिश्र आणि शिवांक मिश्र हे माझे अत्यंत जवळचे शिष्य आहेत. कोरोना काळात सुमित तिवारीने माझी खूप सेवा केली.
20. मठाच्या संपत्तीची जबाबदारी कोणावर द्यावी याचा उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.