IMD Weather Update : (Winter) हिवाळा कुठच्या कुठं पळाला असला तरीही देशाच्या काही भागांमध्ये मात्र पुन्हा एकदा तापमानाच काही अंशांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्यानं बदलणारं वातावरण पाहता नागरिकांच्या आरोग्यासोबतच दैनंदिन व्यवहारांवरही याचे परिणाम होताना दिसून येत आहेत. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली असतानाच महाराष्ट्रही (Maharashtra Weather Update ) दूर राहिलेला नाही. पण, राज्यातील काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे, कारण इथं हवामान विभागाकडून उष्णतेच्या भीषण लाटेचा (heat wave) इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस सोसाट्याचा वारा, पाऊस, वीजांचा कडकडाट, काळ्या ढगांचं सावट ही परिस्थिती कायम असेल. त्यामुळं काही निमित्तानं घराबाहेर पडणं होत असेल, तर त्याआधी Weather Updates पाहून घ्या.
पूर्व भारतामध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Uttarakhand) उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं या भागांतील तापमानाच काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते.
तर, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, अरुणाचल प्रदेश (Arunachal Praesh) आणि सिक्किम (Sikkim) येथे 13 मार्चपर्यंत पावसाची हजेरी असेल. सोबतच वादळी वारे आणि काळ्या ढगांच्या सावटामुळं येथील दृश्यमानताही कमी झालेली असेल. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरचा (Jammu Kashmir) अती उत्तरेकडे असणारा यादरम्यान हलक्या हिमवृषटीचा अनुभव घेऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोकणासह शेजारी राज्य (Goa Weather Update ) गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमान उच्चांक गाठणार असल्यामुळं हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरज असल्यासच दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका अन्यथा घरात राहा असं आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसार हिमालयाच्या पश्चिम भागातून आणखी एक पश्चिमी झंझावात सक्रिय होणार आहे. ज्यामुळं 12 ते 14 मार्च पर्यंत उत्तर भारतात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. अवेळी पावसाच्या हजेरीमुळं तापमानातही काही अंशांची घट होऊ शकते. पण, या हवामान बदलाचे थेट परिणाम पिकांवर मात्र होणार असून, शेतकरी वर्गासाठी ही चिंतेची बाब आहे.