नवी दिल्ली : पगार, पेंशन आणि EMI पेमेंटसारख्या गरजेच्या ट्रान्जॅक्शनसाठी आता तुम्हाला कामकाजाच्या दिवसांसाठी थांबण्याची गरज असणार नाही. RBI ने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरींग हाऊसच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल, 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील. म्हणजेच तुम्हाला आपल्या पगार किंवा पेंशनसाठी शनिवार किंवा रविवार जाण्याची वाट पाहण्याची गरज नसणार आहे. ही सेवा तुमच्यासाठी संपूर्ण आठवडा सुरू असणार आहे.
अनेकदा असे होते की, महिन्याच्या पगारावेळी शनिवार किंवा रविवार येतात. त्यामुळे पगार बँकेच्या खात्यावर जमा होण्यासाठी शनिवार-रविवार जाण्याची वाट पाहावी लागते. आता RBI ने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार सुटीचे दिवस जाऊ देण्याची वाट पहावी लागणार नाही. या सेवा संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
NACH एक बल्क पेमेंट सिस्टिम आहे. ज्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संचलित करते. यासोबतच इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचे हफ्ते, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आणि विमा प्रीमियमचे पेमेंटची सुविधा मिळते. म्हणजेच आता सर्व सुविधा तुमच्यासाठी आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहे.