काँग्रेससोबत आघाडीसाठी ममता तयार, पण राहुलना म्हणाल्या 'ज्युनिअर'

केंद्रामध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण काँग्रेससोबत काम करायला तयार आहोत

Updated: Jul 7, 2018, 09:49 PM IST
काँग्रेससोबत आघाडीसाठी ममता तयार, पण राहुलना म्हणाल्या 'ज्युनिअर' title=

कोलकाता : केंद्रामध्ये भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी आपण काँग्रेससोबत काम करायला तयार आहोत, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या. केंद्रातलं भाजप सरकार शंभर हिटलरसारखं वागत आहे, अशी टीका ममता बॅनर्जींनी केली आहे. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींबरोबर आपण काम केलेलं नाही. राहुल गांधी खूप ज्युनिअर आहेत, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली. एका वर्तमानपत्राला ममता बॅनर्जींनी मुलाखत दिली.

पंतप्रधान व्हायची आपली कोणतीही इच्छा नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या असल्या तरी या रेसमधून त्यांनी स्वत:ला बाहेर ठेवलेलं नाही. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची तयारी करण्याऐवजी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं ममता म्हणाल्या. मी सोनिया आणि राजीव गांधी यांच्याबद्दल जे म्हणू शकते ते राहुल गांधींबद्दल म्हणू शकत नाही, कारण ते खूप लहान आहेत, असं ममतांनी सांगितलं. सगळ्यांना एकत्र करण्याची माझी इच्छा आहे. पण हा माझ्या एकट्याचा निर्णय नसेल. इतर प्रादेशिक पक्षांनाही याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं ममतांनी स्पष्ट केलं.

काही पक्ष काँग्रेसऐवजी तिसरी आघाडी करण्यासाठी आग्रही आहेत. पण त्यांच्या काही प्रादेशिक अडचणी आहेत त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही. भाजपविरुद्ध एकत्र येऊन काम केलं पाहिजे, एवढचं माझं म्हणणं आहे असं ममता म्हणाल्या. 

'ममतांसोबत आघाडी करा'

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पश्चिम बंगालच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली. बंगालमध्ये तृणमूलसोबत आघाडी करण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटानं केली तर अधीर रंजन चौधरी यांनी मात्र या आघाडीला विरोध केला.