नवी दिल्ली : मोदीविरोधी आघाडीच्या बांधणीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू केलंय.
आज सकाळी नास्त्याच्या वेळी ममता बॅनर्जी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांच्यासोबत खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते.
ममता बॅनर्जी 'प्रादेशिक पार्टी' फ्रंट बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मध्यंतरी त्या मुंबईत उद्धव ठाकरे यांनाही भेटल्या होत्या. ही संकल्पना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढेही मांडली आहे. त्यादृष्टीनं आज माझी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाली. चर्चेत आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे होते... पण राजकारणात चार भिंतीआड झालेल्या सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असं संजय राऊत यांनी आपल्या या भेटीबद्दल म्हटलंय. तसंच, कर्नाटक विधानसभा निवडणूक सीमा भागात आमचा एकीकरण समितीला पाठिंबा असेल. उर्वरित कर्नाटक बाबतीत काय करायचे? याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्याशी पक्षांतर्गत चर्चा करून लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबद्दल म्हटलंय. आजच निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात.
त्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनाही भेटल्या. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. त्यांच्यात काय चर्चा झाली? याचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही.