लखनऊमध्ये दहशत; काश्मीरी नागरिकांना मारहाण

संशयित असल्याचे सांगत काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. 

Updated: Mar 7, 2019, 12:06 PM IST
लखनऊमध्ये दहशत; काश्मीरी नागरिकांना मारहाण title=

लखनऊ : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरी लोकांना दिली जाणारी वाईट वागणूक आजही थांबवण्याचे नाव घेत नाही. लखनऊमध्ये सुकामेवा विकणाऱ्या तीन काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. संशयित असल्याचे सांगत काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी काश्मीरी विक्रेत्यांनी तेथून पळ काढला. त्यापैकी एका विक्रेत्याची पोलीस चौकशी. या काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चौकशीनंतर पोलीसांनी एका काश्मीरी विक्रेत्याला त्याच्या नातेवाईकांकडे सोपावले असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण न करण्यासाठी लखनऊमधील अनेक स्थानिक रहिवाशांनी यावेळी हस्तक्षेप केला. लखनऊमधील स्थानिकांनी हे काश्मीरी विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी व्यवसाय करत असल्याचे सांगितले. 

उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधील हसनगंजमधील डालीगंज भागात ही घटना घडली. काश्मीरी विक्रेते याच भागातील रस्त्यांवर सुकामेवा विकतात. यावेळी गाडीतून आलेल्या तीन-चार जणांनी या विक्रेत्यांना मारहाण सुरू केली. आरोपींनी या विक्रेत्यांना संशयित असल्याचे सांगत त्यांना मारहाण सुरू केली. आरोपींनी काश्मीरी तरूणांकडे आधार कार्ड मागितले. आधार कार्ड दाखवल्यानंतरही ते खोटे असल्याचे सांगत पुन्हा मारहाण सुरू केली. काश्मीरी तरूणांना केलेल्या मारहाणीचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी बजरंग सोनकरला ताब्यात घेतले आहे. 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागातील काश्मीरी लोकांना लक्ष्य केले जात असून त्यांना त्रास देण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.