निर्दोष सिद्ध होईपर्यंत सक्रीय राजकारणात प्रवेश नाही - रॉबर्ट वाड्रा

काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते

Updated: Mar 7, 2019, 10:32 AM IST
निर्दोष सिद्ध होईपर्यंत सक्रीय राजकारणात प्रवेश नाही - रॉबर्ट वाड्रा  title=

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू असलेले व्यावसायिक आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य केलंय. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत सक्रीय राजकारणात उतरणार नाही, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय. 

ज्यांनी देशाला लुटून देशाबाहेर पलायन केलंय त्यांचं सरकारनं काय केलं? मी भारत सोडून कुठेही जाणार नाही, असं म्हणत त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधलाय. निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मी ना देश सोडणार ना सक्रीय राजकारणात उतरणार, असंही रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय. 

काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यांनी राजकीय प्रवेशाबद्दल स्पष्टपणे काही म्हटलं नसलं तरी ही शक्यता धुडकावूनही लावली नाही. 'राजकारणात येण्याची कोणतीही घाई आपल्याला नाही. योग्य वेळ येईल तेव्हा आपण याबद्दल निर्णय घेऊ' असं त्यांनी याआधी म्हटलं होतं.   

वाड्रा यांनी लंडनमध्ये बेनामी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा आरोप आहे. या मालमत्ता खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं या प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांचा अंतिम जामीन १९ मार्चपर्यंत वाढवलाय. रॉबर्ट वाड्रा यांनी एक अर्ज सादर करून जामीन मुदत वाढवण्याची विनंती केली होती. 

याशिवाय राजस्थान आणि हरियाणाच्या जमीन व्यवहारांबद्दलही रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आलेत. दिल्ली आणि जयपूरमध्ये अनेकदा त्यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आलीय. ईडीनं कारवाई करत रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीची ४.६२ करोड रुपयांची संपत्ती जप्त केलीय. बीकानेरच्या जमीन घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय. ही संपत्ती रॉबर्ट वाड्रा यांच्या 'स्कायलाईट हॉस्पीटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची आहे.