गुजरात : कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. तर अपुऱ्या रुग्ण सेवेमुळे परिस्थिती अत्यंत नाजूक होत चालली आहे. रुग्णालयात लोकं आपल्या आयुषाशी संघर्ष करत असतात. या वेळी बर्याच लोकांना मानसिक तणावाचा त्रास सहन करावा लागतो. गुजरातमधील भरुच (Bharuch, Gujarat) येथेही असे काहीसे घडले, एखादी व्यक्ती या तणावामुळे काय करु शकते याचा तुम्ही विचार देखील करु शकणार नाही.
एक माणूस एका पुलावर येऊन उभा राहिला आणि आपले पैसे फेकू लागला, तसेच तो पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्या वेळी तो पैसे फेकताना बोलत होता की, या कोरोना काळात या पैशाचा काहीही उपयोग नाही.
अंकलेश्वर येथील पुलाजवळील ही घटना आहे. पुलावर उभा असलेल्या या व्यक्तीने त्याच्या खिशातून पैसे उडवायला सुरू केले. तो काय करत आहे, हे आजूबाजूच्या लोकांना समजले नाही. त्याचे हे वागणे पाहून लोकं घटनास्थळी जमू लागले. लोक त्याला पाहात राहिले, पण त्यानंतर अचानक त्या व्यक्तीने पुलाच्या कडेवर चढून तेथून उडी मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहिल्यावर आजूबाजूला उभे असलेले लोक ताबडतोब त्याच्याकडे धावले आणि त्याला पकडले, त्याला मागे खेचले आणि पुलावरून खाली घेऊन आले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुलावर उभी असलेली व्यक्ती म्हणत आहे की "कोरोना सुरु आहे म्हणून या पैशाचा काही उपयोग होणार नाही". त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की, ही व्यक्ती मानसिक ताणतणावात आहे ज्यामुळे त्याने ही कृती केली.
असे बरेच लोकं आहेत जे या संकटाच्या वेळी त्यांच्या स्वत:च्या समस्या विसरत आहेत आणि लोकांना मदत करण्यात गुंतलेले आहेत. हा व्हिडीओ पाहून, बरेच लोक सोशल मीडियावर आवाहन करत आहेत की, लोकांनी मानसिक तणावात बळी पडू नये आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावा. त्याचवेळी, काही लोकं म्हणत आहेत की, प्रत्येक समस्येचा अंत होतो, त्यामुळे संयम बाळगा.
कोरोनामुळे देशात बरेच लोकं संक्रमित झाले आहेत, त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडली आहे. यावर्षी, कोरोनाच्या नवीन लाटेमुळे संक्रमित रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. ज्यामुळे दररोज समोर येणारी आकडेवारीमुळे लोकं घाबरु लागली आहेत.
या दरम्यान, कोरोना संक्रमण काळात उद्भवणार्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि या कठीण काळात भारताला जगातील बर्याच देशांची मदतही मिळत आहे.